‘नीट’च्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

‘नीट’च्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'नीट' परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करून या विद्यार्थ्यांची 23 जून रोजी फेरपरीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. मात्र, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 6 जुलैपासून सुरू होणार्‍या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर (कौन्सिलिंग) कुठलीही स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ग्रेस गुण रद्द झालेली गुणपत्रिका स्वीकारण्याचा अथवा फेरपरीक्षा देण्याचा पर्यायही सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि निकालातील गोंधळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे केले जाणारे समुपदेशन थांबविण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे. त्यावर न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

या सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना ग्रेस गुण मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची 23 जून रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल 30 जूनपूर्वी जाहीर केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) वकील नरेश कौशिक यांनी न्यायालयाला दिली. प्रवेशासाठी 6 जुलैपासून सुरू होणार्‍या समुपदेशनावर फेरपरीक्षेचा काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री म्हणतात, पेपर फुटला नाही

नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगून याबाबत होत असलेले आरोप केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, एनटीए ही देशातील विश्वासार्ह संस्था असून या संस्थेवर लावण्यात आलेले गैरप्रकाराचे आरोप निराधार आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news