पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आज (दि.१२) चंद्राबाबू नायडू शपथबद्ध झाले. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री म्हणून नायडू यांनी चाैथ्यांदा शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, अनुप्रिया पटेल आणि चिराग पासवान यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, अभिनेते रजनीकांत,चिरंजीवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गळाभेट घेतली.
आजच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेते आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच तेलुगू देसम पार्टीचेराष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
आज सकाळी जाहीर झालेल्या मंत्र्यांच्या यादीत जनसेना पक्षाच्या तीन आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका मंत्र्यांचा समावेश आहे. कोलू रवींद्र, नादेंडला मनोहर, पी नारायण, वंगालपुडी अनिता, सत्यकुमार यादव, निर्मला रामनायडू, एनएमडी फारुक, अनामिक रामनारायण रेड्डी, पय्यावुला केशव, अज्ञानी सत्यप्रसाद, कोळसू पार्थसाराधी, बलवीरंजनेयस्वामी, गोटीपती रवी, कांडला दुर्गेश, गुम्मदी संध्याराणी, जनार्दन रेड्डी, टीजी भरत, एस सविता, वासमशेट्टी सुभाष, कोंडापल्ली श्रीनिवास, मंडीपल्ली राम प्रसाद रेड्डी, अचन्नायडू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
एनडीए'तील तेलुगू देसम पार्टी ' (टीडीपी), जनसेना आणि भाजपच्या आमदारांच्या विजयवाडा येथे झालेल्या बैठकीत 'टीडीपी'चे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची आंध्र प्रदेश 'एनडीए' विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. तर जनसेना पक्षप्रमुख पवन कल्याण यांची विधानसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. बैठकीनंतर नायडू आणि कल्याण यांनी राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांची राजभवनात भेट घेतली व सरकार स्थापनेचा दावा केला होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा चौथा कार्यकाळ असेल.
नुकतच्या झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पारटी, जनसेना आणि भाजपची युती होती. या युतीला विधानसभेच्या १७५ जागांपैकी 'टीडीपी'ने १३५, जनसेनेच्या २१ आणि भाजपच्या ८ अशा १६४ जागा जिंकल्या आहेत.
चंद्राबाबू नायडू यांचा जन्म २० एप्रिल १९५० रोजी झाला. प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे ते जावई. १९९५ रोजी सासरे एन. टी. रामाराव यांच्याविरुद्ध बंड करून ते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री झाले. सलग ९ वर्ष ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादला देशातील आघाडीचे आयटी पार्क केले. आज हैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक असून, जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू यांच्या दूरदृष्टीला जाते. चंद्राबाबू मुख्यमंत्री असताना ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आदी नेत्यांनी हैदराबादला भेट दिली होती. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबाद शहराचीच निवड केली होती.
हैदराबाद शहरावर व माहिती तंत्रज्ञान उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रित करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषतः शेती उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्करून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले. यानंतर ते सलग दहा वर्ष सत्तेच्या बाहेर राहिले. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या. ८ जून २०१४ रोजी नायडू पुन्हा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ देणाऱ्या तेलुगू देशमला १६ लोकसभा जागांवर विजय मिळाला. २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये तेलुगु देसम पक्षाला केवळ २५ जागांवर विजय मिळवता आला होता. आता पुन्हा एकदा चंद्राबाबू आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.