एनडीए सरकारच्या सर्वच मंत्र्यांनी स्वीकारला खात्याचा कार्यभार

एनडीए सरकारच्या सर्वच मंत्र्यांनी स्वीकारला खात्याचा कार्यभार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील ३१ कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज (दि.11) या सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. मोदी सरकारच्या आधीच्या कार्यकाळातील खाती कायम असलेले गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांच्या विभागाची सूत्रे हाती घेतली.

पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या कृषी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. सार्वजनिक आरोग्य पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. सार्वजनिक आरोग्यमंत्री जे. पी. नड्डां यांनी २०१४ नंतर दुसऱ्यांदा या मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली.

रालोआच्या घटक पक्षांतील ५ मंत्र्यांनीही मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे एच. डी. कुमारस्वामी यांनी अवजड उद्योग व पोलाद मंत्रालयाचा तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी यांनी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्याचा कार्यभार सांभाळला. संयुक्त जनता दलाचे ललन सिंह यांनी पंचायती राज, मत्स्यव्यवसाय. दुग्ध व पशुपालन मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली. तेलगू देसम पक्षाचे आर. पी. नायडू यांनी नागरी उड्डायण तर लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांचा कार्यभार स्वीकारला आहे.

कॅबिनेट मंत्र्यांबरोबरच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेल्या ५ मंत्र्यांनीही आपला पदभार स्वीकारला. त्यामध्ये सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन आणि सांस्कृतिक मंत्री राव इंद्रजीत सिंह, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण व आयुष मंत्री प्रतापराव जाधव तर कौशल्य विकास व उद्योजकता आणि शिक्षण मंत्री जयंत चौधरी आदींचा समावेश आहे. इतर सर्व राज्यमंत्र्यांनीही आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारला.

गडकरी, गोयल, आठवले, जाधव, खडसे, मोहोळांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांनी रस्ते व महामार्ग वाहतूक तर पीयूष गोयल यांनी वाणिज्य व उद्योगमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. शिवसेना शिंदे गटाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण खात्याची सूत्रे स्वीकारली. रक्षा खडसे यांनी क्रीडा व युवक कल्याण खात्याचा तर मुरलीधर मोहोळ यांनी सहकार, नागरी उड्डायन खात्याचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली. .

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या प्रतिक्रिया :

गेल्या ५ वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील कामांचे नियोजन करणार आहे. त्यासाठी लवकरच विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार.

– प्रतापराव जाधव, मंत्री, सार्वजनिक आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण मंत्रालय

माझ्या आवडीच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रीपदाची सलग तिसऱ्यांदा जबाबदारी मला मिळाली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.

– रामदास आठवले, मंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news