PM Modi Oath Ceremony : गडकरींसह महाराष्‍ट्रातील ‘या’ नेत्‍यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ | पुढारी

PM Modi Oath Ceremony : गडकरींसह महाराष्‍ट्रातील 'या' नेत्‍यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्ट्रवादी भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्‍यानंतर नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ( PM Modi Oath Ceremony )

पहिल्यांदाच निवडून आलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

रावेरच्या खासदार रक्षा खडसे (भाजप) यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

बुलढाण्‍याचे खासदार प्रतापराव जाधव ( शिवसेना शिंदे गट) यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पंतप्रधान म्‍हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला.सार्कसह विविध देशांतील परदेशी नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदी परदेशी नेत्‍यांसह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित हाेते. आहेत.(PM Modi Oath Ceremony)

भाजपच्या या नेत्‍यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

राजनाथ सिंह,अमित शहा, जेपी नड्‍डा, निर्मला सीतारामण,एस जयशंकर,पीयूष गोयल,सर्बानंद सोनोवाल धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर हिंदूस्‍थान अवामचे नेते जीतनराम मांझी, नितीशकुमार यांच्या जेडीयूचे पक्षाचे नेते लल्लन सिंह यांनीही शपथ घेतली.

 

राजधानी हायअलर्टवर

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार असल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात आल्‍या आहेत.  राजधानी दिल्‍लीतील उंच इमारतींवर एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर सज्ज आहेत. शपथविधी साेहळ्या निमित्त संपूर्ण राजधानी हायअलर्टवर  आहे. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही गुप्तचर यंत्रणांवर आहे. विशिष्ट मार्गांवर पास असेल त्यांनाच प्रवेश दिला गेला.

जमावबंदी, नो फ्लाईंग झोन

संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. 9 ते 10 जूनदरम्यान पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्टवर संपूर्ण दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.शपथविधी सोहळ्यात वंदे भारतच्या 10 लोको पायलटना निमंत्रण देण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button