मंत्रीमंडळाच्या यादीवर मोदी-शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मंत्रीमंडळाच्या यादीवर मोदी-शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नरेंद्र मोदी यांच्या नेतृ़त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी तयार झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी यांनी ही यादी फायनल केली आहे. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाचा उद्या रविवारी होणाऱ्या शपथविधीतील मोठा अडथळा दूर झाला आहे.

मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या निवासस्थानी अनेक बैठकी झाल्या. शेवटी मोदी-शाह यांची मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी बैठक झाली. नरेंद्र मोदी ९ जून रोजी (रविवारी) सायंकाळी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी नवीन मंत्रीमंडळात कोणाला मंत्रीपद आणि कुठली खाती मिळणार यावरुन चर्चा सुरु होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप गृह, संरक्षण, वित्त आणि विदेश मंत्रालय स्वतःकडेच ठेवणार आहे. तर भाजपकडून अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, एस जयशंकर यांच्यासह इतरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या जदयु पक्षातून लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, रालोदच्या जयंत चौधरी आणि लोजपच्या चिराग पासवान यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून कोणाला केंद्रात मंत्रीपद?

महाराष्ट्रातून मंत्रीपदासाठी नितीन गडकरी, नारायण राणे, पियूष गोयल, प्रफुल्ल पटेल, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, उदयनराजे भोसले, रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय आयत्यावेळी नवीन नावांचा समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

उमेदवारांच्या कामगिरीचा बूथनिहाय अहवाल तयार होणार

भाजप मुख्यालयातील बैठकीत जे. पी. नड्डा यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला. प्रत्येक राज्य आणि उमेदवारांची कामगिरी यावर बूथनिहाय अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news