एनडीए भारताचा आत्मा, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

एनडीए भारताचा आत्मा, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) हा विकसित भारताचा आत्मा आहे. देशातील जनतेचा एनडीएवर विश्वास असल्यानेच आम्हाला हा जनादेश मिळाला आहे. त्यामुळे जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील, असे सांगतानाच जुने विक्रम मोडीत काढून ध्येय गाठण्यासाठी नव्या जोमाने काम करू, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. एनडीएच्या सांसदीय पक्ष नेतेपदी सलग तिसऱ्यांदा एकमताने निवड झाल्यानंतर मोदी बोलत होते.

जुन्या संसद इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये (संविधान सदन) एनडीएच्या सांसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ भाजप नेते राजनाथ सिंह यांनी सांसदीय पक्ष नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले. या प्रस्तावाला एनडीएच्या सर्व १३ घटक पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. सांसदीय नेतेपदी औपचारिकपणे निवड झाल्यानंतर मोदी यांनी घटक पक्षांच्या नेत्यांसह सर्वांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले.

मोदी म्हणाले की, सध्याचा काळ हा वेगवान विकासाचा असल्याने देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. आपल्याला वेळ वाया न घालवता काम करायचे आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने देशभरात २०० ठिकाणी बैठका झाल्या. त्यातून जगभरातील लोकांना भारताच्या महान संस्कृतीचा परिचय झाला. एनडीए सरकारने आतापर्यंत २५ कोटी लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढले आहे. आता ३ कोटी गरिबांना घरे देणार आहोत. ४ कोटी जनतेचे घरांचे स्वप्न आम्ही आधीच पूर्ण केलेले आहे. नारी शक्ती वंदन मोहिमेच्या माध्यमातून महिलांना बळ द्यायचे आहे. यावेळी गेल्या कार्यकाळातील प्रमुख गोष्टींचाही मोदी यांनी उल्लेख केला.

विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षात काँग्रेसला १०० चा आकडाही गाठता आला नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जेवढ्या एकत्र जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा आम्ही एकट्या या निवडणुकीत जिंकल्या आहेत. एरवी ईव्हीएमच्या नावाने गळे ओकणारे यावेळी शांत आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा चिमटा काढला. आपल्याच पंतप्रधानांचा काही लोक अपमान करत होते. त्यांचा निर्णय फाडून टाकायचे, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली. युपीएने घोटाळे लपवण्यासाठी नाव बदलले मात्र, लोक त्यांचे घोटाळे विसरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

'राष्ट्र प्रथम' या भावनेशी एनडीएची नाळ जोडलेली आहे. एकत्रितपणे आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीए ही आघाडी केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर राष्ट्राचा आत्मा आहे. भारताच्या राजकीय व्यवस्थेतील ही महत्वाची आघाडी आहे. हे मूल्य अटल बिहारी वाजपेयी, प्रकाशसिंह बादल, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी पेरले होते, असे सांगून मोदी यांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नरेंद्र मोदी यांची सांसदीय नेतेपदी निवड करण्याच प्रस्ताव हा केवळ एनडीएच्या घटक पक्षाचा नसून सबंध देशाचा प्रस्ताव आहे, असे अमित शहा म्हणाले. बैठकीच्या सुरुवातीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाषण केले. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. एनडीएची पहिली बैठक ५ जूनला पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली होती. या बैठकीतच सर्व पक्षांनी मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवडले होते. आज होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि एनडीएचे सर्व खासदार उपस्थित होते.

'या' नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पाठिंबा आहे.

अजित पवार म्हणाले की, या प्रस्तावाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. सर्व नव्या खासदारांनाही अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या. या नेत्यांसह तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी आदी प्रमुख नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठींबा देत शुभेच्छा दिल्या.

९ जूनला नव्या सरकारचा शपथविधी

एनडीएच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदींसह शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींसोबत काही कॅबिनेट मंत्रीदेखील शपथ घेण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news