नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अठराव्या लोकसभेत देशातील तब्बल २८० नवनिर्वाचित खासदार हे पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३३ सदस्यांचा समावेश आहे. चित्रपट अभिनेता, अभिनेत्री, क्रिकेटपटू, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि माजी न्यायाधीश, अशा समाजातील सर्वच क्षेत्रातील मंडळींना जनतेने आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
"झांशी की राणी" या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणारी प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणौत हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल मेरठमधून विजयी झाले आहेत. अभिनेता सुरेश गोपी केरळच्या त्रिशूर येथून निवडून आले आहेत.
किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांना धूळ चारली आहे. पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी काॅंग्रेसचे अधीररंजन चौधरी यांना मात दिली आहे. तालमूक येथून कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय हे देखील संसदेत पोहोचले आहेत. उत्तरप्रदेशातून सर्वाधिक ४५ खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
महाराष्ट्रातून ३३ खासदार पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणार आहेत. त्यामध्ये नाशिकच्या दिंडोरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून विजयी झालेले शिक्षक भास्कर भगरे यांचा समावेश आहे. भगरे यांनी भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पराभव केला. भाजप नेते व केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे सुध्दा पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार बनले आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. कांग्रेसच्या तिकिटावर अमरावतीमधून बळवंत वानखेड़े विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला.
याशिवाय माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे सुपूत्र भाजपचे अनूप धोत्रे अकोला येथून तर अपक्ष विशाल पाटील सांगलीमधून निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले आहेत.
याशिवाय त्रिवेंद्रसिंह रावत (हरिद्वार), मनोहरलाल खट्टर (कर्नाल), बिप्लवकुमार देव (त्रिपुरा, पश्चिम), जीतनराम मांझी (गया), बसवराज बोम्मई (हावेरी), जगदीश शेट्टार (बेलगाम), चरणजीतसिंह चन्नी (जालंधर) पहिल्यांदाच लोकसभा सदस्य बनले आहेत.
राज्यसभेतील खासदार अनिल देसाई (शिवसेना ठाकरे), भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रूपाला पहिल्यांदाच निवडून आले आहेत. राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर ), यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार (म्हैसूर) आणि कृती देवी देबबर्मन (त्रिपुरा पूर्व) हे सुध्दा पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत.