Lok Sabha Election 2024 Results : इंडिया, एनडीए दोन्ही आघाड्या करणार सत्तेचा दावा! जाणून घ्या चार समीकरणे

Lok Sabha Election 2024 Results
Lok Sabha Election 2024 Results

लाेकसभा निवडणुकीच्या निकालाने सत्तेची रस्सीखेच सुरू केली आणि सत्तास्थापनेची समीकरणे आकार घेऊ लागली. मंगळवारी संध्याकाळी सर्व निकाल अंतिम होत असतानाच समोर आलेली ही मोजकी चार समीकरणे.

1. लोकसभेच्या 241 जागांसह सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तेचा दावा करणारे पत्र राष्ट्रपतींना सादर करू शकतो. भाजपसह एनडीए घटक पक्षांच्या जागा मिळून भाजपचे संख्याबळ 291 वर जाते. सर्वांत मोठी निवडणूकपूर्व राजकीय आघाडी म्हणूनच बहुमत सिद्ध करण्याचा दावाही भाजप करू शकेल. 99 जागांसह काँग्रेस दुसर्‍या स्थानावर आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीच्याच 236 जागांच्या बळावर सत्तेचा डाव टाकावा लागेल. काँग्रेसने त्यासाठीची चाचपणी सुरू केली असून त्याबाबतचे चित्र उद्या (बुधवार) हा पक्ष स्पष्ट करेल. इंडिया आघाडीत घटक पक्षांशी चर्चेनंतरच भूमिका स्पष्ट करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.

2. भाजप प्लस एनडीएच्या संख्याबळात मोठा वाटा आहे तो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (14) आणि तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू (15) यांचा. या दोघांनीही इंडिया आघाडीकडे उडी मारल्यास इंडिया 236+14+15 मिळून ही संख्या 265 वर जाते आणि भाजपच्या एनडीएचे संख्याबळ 262 वर घसरेल.

3. आधीच्या दोन समीकरणांनी आकार घेतला तर संख्याबळानुसार इंडिया आघाडी क्रमांक एकवर जाईल आणि भाजपची एनडीए आघाडी दुसर्‍या क्रमांकावर उतरेल. या राजकीय पटावर इंडिया आणि एनडीए दोन्ही आघाड्या सत्तेचा दावा करू शकतील.

4. अठरा जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. ते कोणत्या आघाडीच्या बाजूने झुकतात यावरही ही रस्सीखेच कोण जिंकतो हे अवलंबून राहील. कोण कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या बाजूने किती हे स्पष्ट झाले की सत्तेवरचा हक्क कुणाचा, इंडियाचा की एनडीएचा? की व्यक्तिगत सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपचा? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रश्नांची उत्तर शोधतील आणि उत्तर म्हणून यापैकी कुणा एकास सत्तेचे निमंत्रण देतील. प्राथमिक चित्र हेच सांगते की भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news