Mizoram: ‘रेमल’ चक्रीवादळाचा तडाखा; मिझोराममध्ये दगड खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ ठार

Mizoram: ‘रेमल’ चक्रीवादळाचा तडाखा; मिझोराममध्ये दगड खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'रेमल' चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिझोराममधील आयझॉल  शहरातील दगड खाण कोसळली. या दुर्घटनेत १३ खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'रेमल'ने पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि आता मिझोराममध्ये थैमान घातले आहे. रेमल चक्रीवादळाने राज्यभर हाहाकार माजवल्यानंतर मिझोरामधील आयझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवरील मेल्थम आणि ह्लिमेन दरम्यानच्या भागात असलेली दगडी खाण कोसळून आज (दि.२८ मे) सकाळी ६ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अनेक खाणकामगारांचा मृत्यू झाल्याची भीती

शोध मोहिमेदरम्यान, घटनास्थळावरून एका बालकाची सुटका करण्यात आली आहे. जखमी बालकाला पुढील उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तर इतर अनेक अडकेलल्या खाणकामगारांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान  अडकलेल्या कामगारांना वाचवण्याची शोधमोहिम अजूनही सुरू आहे.

अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तथापि, इतर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संततधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग-६ आणि आंतरराज्य महामार्गही विस्कळीत

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मिझोराममध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. हुंथर येथे राष्ट्रीय महामार्ग ६ वर भूस्खलन झाल्यामुळे ऐझॉल शहराचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे, भूस्खलनामुळे विविध आंतरराज्य महामार्गही विस्कळीत झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news