Rajkot game zone fire : राजकोट अग्निकांड; मृतांची संख्या 33 | पुढारी

Rajkot game zone fire : राजकोट अग्निकांड; मृतांची संख्या 33

राजकोट (गुजरात), वृत्तसंस्था : येथील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी साडेचार वाजता भीषण आग लागली होती. 12 लहान मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी ही संख्या 33 वर गेली आहे.

गेम झोनला असलेले पत्र्यांचे कव्हर तोडून स्थानिकांनी 25 हून अधिक लोकांना आगीतून सुरक्षित बाहेर काढले. आत किती लोक होते, याची नेमकी माहिती अद्यापही कुणाला सांगता आलेली नाही. या वास्तवासह आगीचे एकूणच स्वरूप पाहता मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती वर्तवली जाते. मृतदेहांची ओळख पटू शकलेली नसल्याने त्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल.

अशी लागली आग 

गेम झोनमध्ये मुले खेळत होती आणि पालक या मुलांचे कोडकौतुक करत होते, तेव्हा पायर्‍यांवर वेल्डिंगचे काम सुरू होते. ठिणगी उडाली. लगतच असलेल्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला… आणखी पेट्रोल व डिझेलच्या टाक्या होत्या… कुठलेसे काम सुरू असल्याने गेम झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडांचे तुकडे पसरलेले होते… आयत्या इंधनाने आग एका क्षणात फोफावली आणि हसती-खेळती मुले, बायाबापड्या या लोळाने आपल्या अक्राळविक्राळ कवेत घेतल्या. गेम झोनच्या तिसर्‍या मजल्यावर काही सेकंदात सर्वव्यापी बनलेली होती. दुसरीकडे झोनमधील अग्निशामक यंत्रणा नावाला होती. यंत्रापासून पाईप वेगळा होता.

गेम झोनमधील रबर-रेक्सिन फ्लोअर, 2500 लिटर डिझेलचा साठा, ट्रॅकच्या बाजूला असलेले टायर आणि शेडमध्ये बसवलेले थर्माकोलचे पत्रे… या परिस्थितीने संपूर्ण गेम झोन एका क्षणात भट्टीमध्ये रूपांतरित झाला. सर्व बेचिराख झाले.

तीन मजली इमारत, एकच जिना

तीन मजली इमारतीत खालून वर जाण्यासाठी एकच जिना होता. आग खालपासून वरपर्यंत पसरली. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील लोकांना हलण्याचीही संधी मिळाली नाही.

ठिणगी ते आग सीसीटीव्हीत

राजकोट गुन्हे शाखेने टीआरपी गेम झोनमध्ये बसवण्यात आलेला डीव्हीआर जप्त केला आहे. वेल्डिंग करताना पडलेल्या ठिणगीमुळे आग लागली व ती वेगाने पसरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

सर्व गेम झोन बंदचे आदेश

राजकोटच्या टीआरपी गेम झोनकडे फायर एनओसीही नव्हती. गुजरात सरकारने राज्यातील फायर एनओसी नसलेले सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

असा होता गेम झोन

राजकोटचा टीआरपी गेम झोन सुमारे दोन एकरमध्ये पसरलेला आहे. येथे 10 प्रकारचे खेळ खेळले जाऊ शकतात.

तपासासाठी एसआयटी स्थापन

टीआरपी गेम झोनचा एक मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि इतर दोघे अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे, असे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.

Back to top button