‘स्वतःच्या देशाची काळजी घ्या’ : केजरीवालांनी पाकच्‍या नेत्‍याला सुनावले

‘स्वतःच्या देशाची काळजी घ्या’ : केजरीवालांनी पाकच्‍या नेत्‍याला सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानी राजकारणी चौधरी फवाद हुसैन यांनी भारतामधील सार्वत्रिक निवडणुकांवर टिप्पणी केली होती. त्‍यांच्‍या या टिप्पणीवर दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. पाकिस्‍तानमधील राजकीय नेत्‍यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये आणि स्वत:च्या देशाची काळजी करावी, असे खडेबोल त्‍यांनी सुनावले आहेत.

पाकिस्‍तानी राजकारणी चौधरी फवाद काय म्‍हणाले?

अरविंद केजरीवाल यांनी आपल्‍या कुटुंबासह आज ( दि. 25) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. त्यांनी त्यांच्या X हँडलवर हा फोटो शेअर केला. त्‍यांनी पोस्‍ट केली की, "मी आज माझे वडील, पत्नी आणि मुलांसह मतदान केले. माझी आई खूप आजारी आहे, मी हुकूमशाही आणि महागाईच्या विरोधात मतदान केले आहे. केजरीवाल यांची ही पोस्‍ट पाकिस्तानी राजकारणी चौधरी फवाद हुसैन यांनी शेअर केली. तसेच "शांतता आणि सौहार्द दहशतवादी शक्तींचा पराभव करू दे," अशी कॅप्‍शनही त्‍यांनी #MorePower #IndiaElection2024 हॅशटॅग दिली.

तुमच्या ट्विटची गरज नाही : केजरीवालांनी दिली तीव्र प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल यांनी हुसैन यांच्या टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्‍यांनी तत्‍काळ उत्तर दिले. केजरीवालांनी तत्‍काळ चौधरी यांच्‍या पोस्‍टला उत्तर देताना म्‍हटलं की, "चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील जनता आमचे मुद्दे हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्विटची गरज नाही. पाकिस्तानची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या,"
"भारतात होणाऱ्या निवडणुका ही आमची अंतर्गत बाब आहे. भारत दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही," असेही केजरीवाल यांनी चौधरी यांना सुनावले आहे.

चौधरी यांनी केला होता राहुल गांधीचा व्‍हिडिओ शेअर

चौधरी फवाद हुसेन यांनी भारतीय राजकारण आणि निवडणुकीत भाष्‍य करण्‍याचीह ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच त्‍यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्‍ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका करताना दिसत आहेत. त्‍यापूर्वी ४ मे रोजी चौधरी यांनी सत्तेत आल्यास संपत्ती पुनर्वितरण सर्वेक्षणाच्‍या काँग्रेसच्या आश्‍वासनाबद्दल राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यांनी राहुल गांधी यांची तुलना त्यांचे पणजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news