Dinesh Karthik | दिनेश कार्तिक भावूक! IPL मधून निवृत्तीचे संकेत | पुढारी

Dinesh Karthik | दिनेश कार्तिक भावूक! IPL मधून निवृत्तीचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सने बुधवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या एलिमिनेटर लढतीत ‘आरसीबी’ला धक्का दिला. एलिमिनेटरमध्ये RCB चा राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर अनुभवी विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने संकेत दिले की कदाचित हा त्याचा शेवटचा आयपीएलचा सामना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या प्लेऑफ सामन्यातील पराभवानंतर कार्तिकने हातमोजे काढले आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्तिक भावूक, विराट कोहलीला मारली मिठी

१७३ धावांचा यशस्वी पाठलाग करत राजस्थानसाठी रोव्हमन पॉवेलने विजयी धावा घेतली. त्यानंतर ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने भावूक होत विराट कोहलीला मिठी मारली. दरम्यान, कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती होत असल्याची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण आयपीएल २०२४ हा त्याचा खेळाडू म्हणून शेवटचा हंगाम असेल.

RCB कडून गार्ड ऑफ ऑनर

राजस्थान रॉयल्सकडून ४ विकेट्सनी पराभव स्वीकारल्यानंतर खेळाडू मैदानाबाहेर जाण्यापूर्वी दिनेश कार्तिकला त्याच्या RCB सहकाऱ्यांकडून भावनिक असा गार्ड ऑफ ऑनर मिळाला. आरसीबीच्या या खेळाडूसाठी बुधवारची संध्याकाळ भावूक करणारी होती.

दिनेश कार्तिकची IPL कारकीर्द

दिनेश कार्तिकने आयपीएलमधील २५७ सामन्यांत ४,८४२ धावा केल्या आहेत. त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे. कार्तिकचे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० खेळाडूंच्या यादीत नाव आहे. RCB सोबत कार्तिकची IPL २०२२ मध्ये अविश्वसनीय कामगिरी राहिली. त्याने १८३ स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या होत्या. यामुळे त्याला T20I आणि वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले. कार्तिकने आयपीएल २०२४ च्या हंगामात १५ सामन्यांत ३२६ धावा केल्या.

दरम्यान, कार्तिकला १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

आयपीएलमध्ये ६ संघांकडून खेळला

यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत एकूण ६ संघांकडून खेळला. २०११ मध्ये पंजाब संघात निवड होण्यापूर्वी त्याने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सुरुवात केली. २०१४ मध्ये दिल्ली संघात परतण्यापूर्वी तो दोन हंगाम मुंबईसोबत खेळला. २०१५ मध्ये आरसीबीने त्याला घेतले. केकेआरसोबत ४ हंगामात खेळण्यापूर्वी तो २०१६ आणि २०१७ मध्ये गुजरात लायन्सकडून खेळला. कार्तिक २०२२ मध्ये RCB मध्ये परतला आणि फिनिशरची भूमिका पूर्णत्वास नेली.

हे ही वाचा :

Back to top button