अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबादेतील विमानतळावरून 'इसिस'च्या 4 दहशतवाद्यांना सोमवारी अटक केली. चौघे श्रीलंकेचे नागरिक आहेत. अहमदाबादेत दोन दिवस होणार असलेल्या आयपीएल सामन्यांत घातपाताचा या दहशतवाद्यांचा इरादा होता किंवा कसे, त्याची चौकशी 'एटीएस'कडून सुरू आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून याबाबतची गोपनीय माहिती गुजरात 'एटीएस'ला देण्यात आली होती. त्यावरून ही कारवाई पुढे सरकली व चौघांच्या मुसक्या बांधण्यात आल्या.
सुरुवातीला विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेच्या 'रडार'वर एक संशयित आला होता. त्याला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी सुरू केली असता तो श्रीलंकेचा नागरिक असल्याचे समोर आले आणि उर्वरित तिघांचीही ओळख पटली. सारे जाळ्यात अडकले.
भारतातील ज्यू धर्मीयांची स्थळे या चौघा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, असेही सांगण्यात येते. हे चौघे त्यांच्या पाकिस्तानातील सूत्रधाराच्या इशार्याची वाट बघत होते.
'इसिस'कडून यावेळी परदेशी दहशतवादी भारतात पाठविण्यात आले आहेत. असे पहिल्यांदाच घडले असून, 'इसिस'चा हा असा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येते. मार्चमध्ये 'इसिस'च्या भारतप्रमुखाला आसाममधील ढुबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय!