Punjab Lok Sabha Election : पंजाबमध्ये हमीभाव, बेरोजगारी मुख्य मुद्दे

Punjab Lok Sabha Election : पंजाबमध्ये हमीभाव, बेरोजगारी मुख्य मुद्दे

पंजाबमध्ये एक जून रोजी लोकसभेच्या सर्व तेरा जागांसाठी मतदान होणार असून, येथे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीसह, गोवा, गुजरात आणि हरियाणामध्ये हे दोन्ही पक्षा हातात हात घालून एनडीएविरुद्ध लढत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या राज्यात आठ जागा जिंकल्या होत्या. भाजप आणि अकाली दल यांना प्रत्येकी दोन जागांवर, तर सत्तारूढ आम आदमी पक्षाला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले होते. विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरुर मतदार संघातून तेव्हा विजय मिळवला होता. नंतर त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला अकाली दलाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.

यावेळी आम आदमी पक्षाने तेरापैकी किमान दहा जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या उमेदवारांशी होईल हे खरे असले तरी भाजप आणि अकाली दलाचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गुरदासपूर, जालंधर, होशियारपूर, अमृतसर, खडूर साहिब, लुधियाना, फतेहगढ साहिब, फरिदकोट, आनंदपूर साहिब, फिरोजपूर, संगरूर, बठिंडा आणि पतियाळा या सगळ्या मतदार संघांत चौरंगी लढती होणे अटळ बनले आहे.

चारही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला रंग चढू लागला आहे. भाजप या राज्यातून प्रथमच सर्व जागांवर लढत आहे. यापूर्वी अकाली दलाशी युती असताना भाजपला तीन-ते चार जागांवर समाधान मानावे लागत असे. यावेळी भाजपने सर्व मतदार संघांची जिंकण्याच्या शक्यतेनुसार विभागणी केली असून, त्याप्रमाणे तिकिटांचे वाटप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंजाबमध्ये प्रचाराला येत असून, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. फिरोजपूरमध्ये भाजपने राणा गुरमीत सिंह सोढी यांना, तर संगरूर या प्रतिष्ठेच्या मतदार संघातून अरविंद खन्ना यांना रिंगणात उतरवून हिंदू कार्ड खेळले आहे. या दोन्ही ठिकाणी हिंदू मतांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भाजपला येथे विजयाचा विश्वास वाटतो.

पंजाबमध्ये यावेळी बेरोजगारी आणि शेतमालाला हमीभाव हे मुख्य मुद्दे असल्याचे दिसून येते. सत्तारूढ मान सरकारला बेरोजगारीचा विषय सोडविता आलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यावरून आम आदमी पक्षाला घेरायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने राष्ट्रीय महागाईसह शेतकर्‍यांची नाराजी, हे मुद्दे प्रचारात आणले आहेत. पंजाबमध्ये शेतमालाचे प्रचंड उत्पादन होत असल्यामुळे तेथील 20 लाख शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत आहेत. जो पक्ष आमचा हा कळीचा मुद्दा सोडवेल त्यालाच मतदान, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. अकाली दलाने याच विषयावरून भाजपची साथ सोडली होती.

तथापि, दिवसेंदिवस हा पक्ष या राज्यात निष्प्रभ होत असल्याचे दिसून येते. यावेळी अकाली दलामध्ये उमेदवारीवरूनही नाराजी निर्माण झाली आहे. प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसने आम आदमी पक्षावर थेट टीका करणे टाळण्यावर भर दिला आहे.

शेतकर्‍यांचा सामूहिक भ्रमनिरास

शेतकर्‍यांचा संताप एवढ्या टोकाला गेला आहे की, बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करणेही कठीण बनले आहे. हमीभावाचे काय, असा प्रश्न शेतकर्‍यांकडून विचारला जाताच उमेदवारांकडे त्याला उत्तर नाही. पोकळ आश्वासने देऊन उमेदवार वेळ मारून नेताना दिसत आहेत. शेतकर्‍यांनाही आता हा प्रकार कळून चुकला आहे. काँग्रेसने हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला आहे. मात्र, शेतकर्‍यांचा कोणत्याच पक्षावर विश्वास उरलेला नाही. मान सरकारने सत्तेवर येताच शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली होती. ती कागदावरच उरली आहे. जोडीला बेरोजगारीचा विषय तापत चालला आहे. बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्त झालेली युवापिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालली आहे. या निवडणुकीत हाही प्रमुख मुद्दा बनला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news