सेमी क्रायोजेनिक इंजिनची आणखी एक चाचणी यशस्वी | पुढारी

सेमी क्रायोजेनिक इंजिनची आणखी एक चाचणी यशस्वी

बंगळूर, वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अर्ध क्रायोजेनिक इंजिनच्या विकासाचा आणखी एक टप्पा मंगळवारी पार केला. इंजिनच्या शक्तीची आणखी एक चाचणी यशस्वी केली.

सेमी क्रायोजेनिक इंजिन सुरू करण्यासाठी प्रीबर्नरला प्रज्वलित करण्यात आले आणि ही चाचणी यशस्वी झाली, असे ‘इस्रो’कडून सांगण्यात आले.

महेंद्रगिरी येथे झालेल्या या चाचणीअंती हे इंजिन ‘इस्रो’च्या ‘एलव्हीएम-3’ रॉकेटची पेलोड क्षमता वाढवण्यास मदत करेल, हे स्पष्ट झाले आहे. ‘एलव्हीएम-3’ रॉकेटच्या माध्यमातूनच भारताने ‘चांद्रयान-3’ मोहीम प्रक्षेपित केली होती.

‘चांद्रयान-4’ मोहिमेतही ‘एलव्हीएम-3’ रॉकेटच वापरले जाणार आहे, हे येथे महत्त्वाचे. आगामी मोहिमेत विकास इंजिनऐवजी चाचणी यशस्वी झालेले सेमी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येईल.

सेमी क्रायोजेनिक इंजिन काय?
– ‘इस्रो’चे सेमी क्रायोजेनिक इंजिन द्रवरूप ऑक्सिजन आणि केरोसीनच्या मिश्रणावर चालते.
– हे इंजिन 2 हजार केएनचा थ्रस्ट (शक्ती) निर्माण करते.

बुलंद भारत की बुलंद तसवीर…

मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या अंतराळ संस्थेने 1991 मध्ये ‘इस्रो’ला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान देण्याचे मान्य केले होते. अमेरिका, जपान, युरोप आणि चीन या विरोधात होते. 1993 मध्ये, बोरिस येल्तसिन यांच्या नव्या सोव्हिएत सरकारने अमेरिकेच्या दबावामुळे भारताला हे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला; मग भारताने ते स्वत: विकसित करण्याचे ठरवले.

भारतात 2 क्रायोजेनिक इंजिन

1) सीई-7.5 : या इंजिनचा ‘जीएसएलव्ही मार्क-2’ रॉकेटच्या वरच्या टप्प्यात वापर केला जातो.

2) सीई-20 : ‘एलव्हीएम-3’ रॉकेटमध्ये हे इंजिन वापरण्यात येते. त्यात द्रवरूप ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो. सेमी क्रायोजेनिक इंजिनमध्ये मात्र द्रवरूप हायड्रोजनऐवजी केरोसीन वापरले जाते. द्रवरूप ऑक्सिजनचा वापर यात ऑक्सिडायझर म्हणून केला जातो.

Back to top button