Amethi Congress Lok Sabha : २५ वर्षांनंतर अमेठीतून गांधी परिवाराची माघार | पुढारी

Amethi Congress Lok Sabha : २५ वर्षांनंतर अमेठीतून गांधी परिवाराची माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील अमेठी हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. परंतु आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये तब्बल २५ वर्षांनंतर याठिकाणी गैर-गांधी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने नुकतीच के. एल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर केली. ते काँग्रेस आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय मानले जातात. (Amethi Congress Lok Sabha)

यूपीमधील अमेठी हा हायप्रोफाईल जागांपैकी एक मतदारसंघ मानला जातो. यापूर्वी १९९८ मध्ये काँग्रेसकडून कॅप्टन सतीश शर्मा यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती. १९९९ नंतर पुढे सातत्याने २५ वर्षे ही जागा गांधी परिवाराकडून लढवली जात आहे. आज शुक्रवारी (दि.३) सकाळी जाहीर झालेल्या यादीत अमेठीमधून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा बदलले आहे. (Amethi Congress Lok Sabha)

सन १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी अमेठीतून पहिली निवडणूक लढवली होती. नंतर सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये आपल्या मुलासाठी ही जागा सोडली. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राहुल गांधींनी अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकली. परंतु, २०१९ मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला. सन १९९८ मध्ये गांधी घराण्याचे जवळचे कॅप्टन सतीश शर्मा यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ही जागा सातत्याने २५ वर्षे गांधी कुटुंबासाठी राखीव आहे. (Amethi Congress Lok Sabha)

Amethi Congress Lok Sabha : अमेठी गांधी परिवाराचा बालेकिल्ला

आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अमेठीतून काँग्रेसजन राहुल गांधींच्या नावाची मागणी करत होते. मात्र, शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीत सोनिया गांधी यांचे विश्वासू किशोरीलाल शर्मा यांचे नाव जाहीर करण्यात आले. १९७६ च्या लोकसभा निवडणुकीत गांधी परिवाराने अमेठीत दार ठोठावले होते. त्यावेळी संजय गांधी यांनी येथे पोहोचून श्रमदान करून राजकीय मैदान तयार केले. मात्र, १९७७ च्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे संजय गांधी यांचा पराभव झाला. १९८० मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली. पण त्याच वर्षी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आपली राजकीय खेळी सुरू केली. पुढे राजीव गांधी यांनी १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये सातत्याने विजय मिळवला.

राजीव गांधींचे सहकारी सतीश यांनी वारसा सांभाळला

कॅप्टन सतीश शर्मा यांनी राजीव गांधी यांच्या निधनानंतर १९९१ मध्ये अमेठीची पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होता. १९९६ मध्येही काँग्रेसकडून सतीश यांनी निवडणूक जिंकली पण १९९८ मध्ये त्यांचा पराभव झाला. १९९८ मध्ये भाजपचे संजय सिंह अमेठी मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी अमेठीतून पहिली निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. पुढे २००४ पासून राहुल गांधीच हे गांधी परिवाराच्या वडिलोपार्जित असलेली जागा अमेठीमधून निवडणूक लढत होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अमेठीमध्ये बदल करत, गांधी परिवाराचे निकटवर्तीय किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली.

Back to top button