हरियाणात मोदींची गॅरंटी विरुद्ध जातीय समीकरणे | पुढारी

हरियाणात मोदींची गॅरंटी विरुद्ध जातीय समीकरणे

सुनील डोळे

राजधानी दिल्लीपासून जवळच असलेल्या हरियाणात यावेळी मोदींची गॅरंटी विरुद्ध जातीय समीकरणे असे चित्र दिसून येते. भाजपने महिन्यापूर्वी आपले सर्व दहाही उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. विरोधी काँग्रेसने आतापर्यंत आठ उमेदवारांची घोषणा केली असून, दोन जागांबद्दल त्या पक्षाचा निर्णय अजूनही झालेला नाही. भाजपला शह देण्यासाठी जातीय समीकरणे लक्षात घेऊन काँग्रेसने यावेळी तिकिटांचे वाटप केले आहे. सोबतच दुष्यंत चौताला यांचा जननायक जनता पक्षही रिंगणात आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

हरियाणामध्ये सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिसार, कर्नाल, सोनिपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुरुग्राम आणि फरिदाबाद या दहा मतदार संघांत मतदान होणार आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कर्नालमधून उतरविले असून, काँग्रेसने त्यांच्या विरोधात दिव्यांशु बुद्धिराजा हा युवा चेहरा दिला आहे. अनुभव विरुद्ध तरुणाई असा हा मुकाबला रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यातून दहा जागा जिंकून क्लीन स्वीप केला होता. यावेळी काँग्रेसचे उमेदवार पाहिले तर भाजपला पुन्हा सगळ्या जागांवर कमळ फुलविण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल, असे दिसून येते. मनोहर लाल खट्टर यांच्यावर भाजपला विजयी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही प्रचारात जोर लावला आहे. मोदींची गॅरंटी अर्थात चौफेर विकास हा मुद्दा भाजपने लावून धरला आहे. काँग्रेसकडे भाजपचा प्रतिवाद करण्यासारखे फारसे काहीही नसल्यामुळे त्या पक्षाने जातीय समीकरणांचा आधार घेतला आहे. हरियाणात जातीय समीकरणे नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहेत. विरोधी आघाडीने कुरुक्षेत्रमधून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. सुशील गुप्ता यांच्यावर डाव खेळला आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी भाजपने उद्योगपती तथा माजी खासदार नवीन जिंदाल यांना मैदानात उतरविले आहे. याशिवाय इंडियन नॅशनल लोक दलाचे सरचिटणीस अभय चौताला हेही येथून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कुरुक्षेत्रावरील या तिरंगी लढाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गुरुग्रामबद्दल काँग्रेस द्विधा मनःस्थितीत

गुरुग्राम हा उच्चभू्र लोकवस्ती असलेला मतदार संघ मानला जातो. येथे भाजपने केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसचे या जागेवरून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. अभिनेते राज बब्बर यांच्यासाठी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा प्रयत्नशील आहेत. मात्र, माजी मंत्री कॅप्टन अजय यादव हेही या जागेसाठी अडून बसले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा निर्णय रखडला आहे. स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांचे नावही या जागेसाठी पुढे आले आहे. फरिदाबादमध्ये भाजपने केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांना संधी दिली आहे. काँग्रेसने माजी मंत्री महेंद्र प्रताप सिंह यांना रिंगणात उतरवले आहे. येथेही ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे. अंबाला काँग्रेसचे आमदार वरुण मुलाना यांची लढत केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांची पत्नी तथा भाजपच्या उमेदवार बंतो कटारिया यांच्याशी होत आहे.

यंदा चुरस वाढली

सिरसा मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री कुमारी सैलजा यांना काँग्रेसने तिकीट दिले असून, त्यांना भाजपचे डॉ. अशोक तवर यांच्याशी लढत द्यायची आहे. हे दोन्ही नेते हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सोनिपतमध्ये मोहन लाला बडोली (भाजप) आणि सतपाल ब्रह्मचारी (काँग्रेस) यांच्यात लक्षवेधी लढत आहे. रोहतकमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांचा मुकाबला भाजपचे विद्यमान खासदार डॉ. अरविंद शर्मा यांच्याशी होत आहे. जर हुड्डा विजयी झाले, तर काँगे्रसला राज्यसभेच्या खासदारकीवर पाणी सोडावे लागेल. भिवानीत श्रुती चौधरी (काँग्रेस) विरुद्ध विद्यमान खासदार चौधरी धर्मबीर (भाजप) यांच्यात लढत होत आहे. हिस्सारमध्ये तर चौरंगी लढत असून, तेथे दिवंगत माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबातील तीन सदस्य मैदानात उतरले आहेत. भाजपच्या तिकिटावर रणजित चौताला, जननायक जनता पक्षाकडून नैना सिंह चौताला, तर इंडियन नॅशनल लोक दलाने सुनैना चौताला यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल, यात शंका नाही.

Back to top button