नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सोमवारी मानहानीच्या खटल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.. दिल्ली भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांनी अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमीष दाखवल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केल्याने ही याचिका दाखल करण्यात आली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या नेत्या, मंत्री अतिशी यांच्याविरोधात मानहानीचा खटल्याची याचिका दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात दाखल करण्यात आली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना भाजपकडून पक्षात येण्यासाठी करोडो रुपयांचे आमीष दाखवण्यात आल्याचे आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री अतिशी यांनी केले होते. त्या आरोपांच्या विरोधातील या याचिकेमध्ये प्रवीण शंकर कपूर यांनी दावा केला आहे की, "आम आदमी पक्षाने केलेले आरोप तथ्यहीन आहेत, त्यांनी केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत."
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील मानहानीच्या याचिकेवर ४ मे रोजी दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायालयाचे मुख्य दंडाधिकारी तान्या बामनियाल यांनी सूचीबद्ध केले आहे.