पुढारी ऑनलाईन डेस्क: संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आणि नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु यूजीसीने आपल्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला असून नेट परीक्षेची तारीख बदलली आहे. यापूर्वी UGC NET जून 2024 परीक्षा रविवार १६ जून, २०२४ ला होणार होती, परंतु याच दिवशी UPSC ची पूर्व परीक्षा असल्याने UGC NET ची परीक्षा आता दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. यूजीसीने केलेल्या बदलानुसार UGC NET 2024 परीक्षा आता मंगळवार १८ जून रोजी होणार आहे. या संदर्भातील माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (UGC NET 2024)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर या सुधारित वेळापत्रकाबद्दल अधिकृत सूचना जारी करेल. माहिती बुलेटिन नुसार, UGC NET 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि उमेदवार शुक्रवार 10 मे 2024 पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात, असे देखील यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी निवेदनात म्हटले आहे.
सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएचडी प्रवेशासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी UGC-NET परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाकडू दरवर्षी दोनवेळा आयोजित करण्यात येते.