Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे पंजाबमधील लोकसभेचे ४ उमेदवार जाहीर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे पंजाबमधील लोकसभेचे ४ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधील ४ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. हरियाणामध्ये एकूण १३ लोकसभा क्षेत्र आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस, आम आदमी पक्ष, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात चौरंगी लढत होत आहे. या चौरंगी लढतीत काँग्रेसने आतापर्यंत १३ पैकी १२ जागा जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीत प्रदेशाध्यक्ष अमरींदर सिंह बरार यांना लुधियानामधून तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुखजिंदर सिंह रंधावा यांना गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कुलबिर सिंह झिरा यांना खदुर साहिब मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसेच माजी खासदार विजय इंदर सिंगला यांना आनंदपुर साहिब मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली, त्यात या चार नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक जूनला मतदान होत आहे.

दरम्यान, आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे विद्यमान खासदार मनीष तिवारी यांना चंदीगड लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी उमेदवारी दिली आहे. तर लुधियानाचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Back to top button