नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : ट्विटर च्या खासगी धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. व्यक्तीच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करता येणार नाहीत. कंपनीने आपल्या खासगी धोरणात बदल करीत त्यात खासगी फोटो आणि व्हिडीओ यांचा समावेश केला आहे.
आतापर्यंत कोणताही युजर्स दुसर्या युजर्सचे व्हिडीओ आणि फोटो त्याच्या परवानगीशिवाय पाठवू शकत होता. मात्र, आता तसे करता येणार नाही. नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणे हा आहे.
खासगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानीदेखील होऊ शकते. असे ट्विटरने सांगितले आहे. गैरवापर केल्याने खासगी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
खासकरून महिला आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते, असेही कंपनीने म्हटले आहे. ट्विटर चा हा नियम पब्लिक फिगर नसलेल्या व्यक्तींसाठीच आहे.