नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील आजवरचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले असून, त्याची चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली आहे. एकापाठोपाठ 6 स्नायपर बुलेट शूट केल्यानंतर या जॅकेटमध्ये एकही गोळी शिरू शकली नाही, हे विशेष!
पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटपासून ते बनविण्यात आले आहे. जॅकेटचे स्वतंत्र डिझाईन सैनिकांना मजबूत संरक्षण देईल. कानपूर येथील 'डीआरडीओ'च्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या देखरेखीखाली हे जॅकेट तयार झाले. चंदीगड येथे जॅकेटची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली.
कुठल्याही मोहिमेदरम्यान हे जॅकेट परिधान करणे सैनिकांना सोयीचे आणि सुरक्षित असेल. जॅकेटच्या आयसीडब्ल्यू हार्ड आर्मर पॅनेलची (एचएपी) एरियल डेन्सिटी (हवाई घनता) 40 कि.ग्रॅ./एम 2 आणि स्टँडअलोन एचएपीची एरियल डेन्सिटी 43 कि.ग्रॅ./एम 2 हूनही कमी आहे, असे जॅकेटच्या वजनासंदर्भातील माहिती देताना संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाकडे भारत वेगाने पुढे निघालेला आहे. आमच्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर आता आम्हाला कुणावर मदतीसाठी विसंबून राहावे लागणार नाही. संरक्षण, बचाव, चढाई, आक्रमणासाठी आम्ही आता तत्पर आहोत. कुठल्याही क्षणी युद्धाला तयार आहोत.
– मनोज पांडे, लष्करप्रमुख