आई-बहिणींचे मंगळसूत्रही हिसकावले जाईल; काँग्रेसच्या वारसा करावर पीएम मोदींचा हल्लाबोल | पुढारी

आई-बहिणींचे मंगळसूत्रही हिसकावले जाईल; काँग्रेसच्या वारसा करावर पीएम मोदींचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचा हेतू चांगले नाही. आता त्याचे घातक इरादे उघडपणे सर्वांसमोर येऊ लागले आहेत. तुमची आयुष्यभराची कमाई, तुमची घरं, दुकानं, शेतं आणि कोठारं यावर काँग्रेसची नजर आहे. काँग्रेसचे राजपुत्र म्हणतात की ते देशातील प्रत्येक घर, प्रत्येक कपाट आणि प्रत्येक कुटुंबाच्या मालमत्तेचा एक्स-रे काढणार आहेत. आपल्या माता-भगिनींकडे असलेले स्त्रीधन म्हणजे दागिन्यांची काँग्रेस चौकशी करेल. आई बहिणींचे मंगळसूत्रही हिसकावून घेतले जाईल. त्यामुळे आता ते वारसा कराबद्दल बोलू लागले आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर केला.

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (दि.२४) छत्तीसगडमधील सुरगुजा येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील विधानावर जोरदार निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, वारसा कर लावून तुमच्या आई-वडिलांची संपत्ती काँग्रेस हिसकावून घेईल. तुम्ही तुमच्या कष्टाने जमवलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळावी, असे त्यांना वाटत नाही. भारतीयांनी त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना द्यावी, असे त्यांना वाटत नाही. हा पक्ष शहरी नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. ते तुमची सर्व दुकाने आणि घरे काढून घेतील.

काँग्रेसचा एकच मंत्र आहे. काँग्रेसची लूट हयातीत आणि आयुष्यानंतरही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावेल आणि तुम्ही यापुढे जिवंत राहणार नाही, तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा पडेल. त्यांना आता भारतीयांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना द्यावी, असे वाटत नाही. काँग्रेस हे सर्व हिसकावून कोणाला देणार हे माहीत आहे का? मला सांगायची गरज नाही. पण तुम्ही स्वतःला हे पाप करू द्याल का? पण त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, जनता त्यांना ही संधी देणार नाही.

अमित शहा यांनीही काँग्रेसवर साधला निशाणा

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शहा यांनीही टीकास्त्र सोडले आहे. आज पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा उद्देश देशासमोर स्पष्ट झाला आहे. आधी त्यांच्या जाहीरनाम्यात ‘सर्वेक्षण’चा उल्लेख, मनमोहन सिंग यांचे जुने विधान जे काँग्रेसचा वारसा आहे, देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे आणि आता संपत्तीच्या वाटपावर अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा यांनी टिप्पणी केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात सॅम पित्रोदा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा संपूर्ण काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅकफूटवर आल्या आहेत. मला विश्वास आहे की काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल.

विधान काय होते?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नुकतेच म्हटले होते की, निवडणुकीनंतर त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वेक्षण केले जाईल आणि कोणाकडे किती मालमत्ता आहे, हे शोधून काढले जाईल.

तर सॅम पित्रोदा यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारले असता त्यांनी अमेरिकेत लागू करण्यात आलेल्या वारसा कराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल. त्यांच्या मृत्यूनंतर, 45 टक्के मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली जाते, तर 55 टक्के मालमत्ता सरकारची मालकी बनते.

ते म्हणाले की या कायद्या अंतर्गत, तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर संपत्ती निर्माण केली आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही तुमची संपत्ती लोकांसाठी सोडली पाहिजे, अशी तरतूद यात आहे. संपूर्ण मालमत्ता नाही तर अर्धी, जी मला योग्य वाटते. पण भारतात असा कोणताही कायदा नाही. जर येथे कोणाची संपत्ती 10 अब्ज रुपये आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांना त्याची सर्व मालमत्ता मिळते, लोकांसाठी काहीही उरत नाही. मला वाटते की लोकांनी अशा विषयांवर चर्चा केली पाहिजे. या चर्चेतून काय निष्पन्न होईल, माहीत नाही. आम्ही नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत आहोत, जे केवळ श्रीमंतांच्या हिताचे नसून लोकांच्या हिताचे असले पाहिजेत.

हेही वाचा 

Back to top button