निवडणुकीत देव, अंगारा, भंडारा आणि भाकरीसुद्धा! | पुढारी

निवडणुकीत देव, अंगारा, भंडारा आणि भाकरीसुद्धा!

सुनील कदम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात एखाद्या गावाला, मोठ्या समाज समूहाला किंवा समाज प्रमुखाला वेगवेगळ्या शपथा दिल्या जाताना दिसत आहेत. मात्र, काळाच्या ओघात शपथेला जागणार्‍यांची संख्या मात्र कमी होताना दिसत आहे.

ग्रामीण भागातील समाजमनावर आजही वेगवेगळ्या देव-देवतांचा मोठा पगडा असलेला दिसून येतो. आपापल्या कुळदैवतांवर निस्सीम श्रद्धा असणार्‍यांचीही कमतरता नाही. काही काही गावांमध्ये त्या त्या गावातील ग्रामदैवतांवर लोकांची अपार श्रद्धा असते. त्याचप्रमाणे काही विशिष्ट समाजाच्या विशिष्ट देव-देवता असतात, या दैवतांवर या समाजाची पूर्वापार श्रद्धा असते. लोकांमधील या श्रद्धांचाही निवडणुकीच्या निमित्ताने सौदा होताना दिसत आहे.

उमेदवारांच्या काही खास लोकांवर ही खास जबाबदारी असते. अशी कारभारी मंडळी तिन्हीसांजेला किंवा मध्यान रात्रीसुद्धा एखाद्या गावात दाखल होतात आणि गावातील प्रमुख मंडळींना एखाद्याच्या घरी किंवा एखाद्या गुप्त ठिकाणी बोलावणे धाडले जाते. प्रमुख मंडळी जमा झाली की कधी साग्रसंगीत चहापानाचा तर कधी पेय-पानासह सामिष भोजनाचा बेत पार पडतो. त्यानंतर सुरू होते ती मतदानाची चर्चा. उमेदवाराची कारभारी मंडळींकडून गाव प्रमुखांना आपल्याच उमेदवारांना मतदान करण्यासाठी गळ घातली जाते. त्यासाठी काही ‘व्यवहारही’ पार पाडले जातात, तर भविष्यात गावासाठी अमूक करू, तमूक करू, अशी आश्वासनं दिली जातात.

गावातील प्रमुख मंडळींकडूनही त्यांच्याच उमेदवाराला गावातील झाडून सगळी मते देण्याचे आश्वासन दिले जाते. पण केवळ या आश्वासनावर विसंबून कारभारी मंडळी काढता पाय घेत नाहीत, तर त्यांना हवा असतो पक्का शब्द! त्यासाठी मग भरल्या बैठकीतच गावातील ग्रामदैवताचा जो काय अंगारा-भंडारा असेल तो आणला जातो आणि मताच्या हमीसाठी गावातील प्रमुख मंडळींना या अंगार्‍या, भंडार्‍याची शपथ दिली जाते आणि हा शपथविधी पार पडला की उमेदवाराची कारभारी मंडळी आपण गाव बुक केल्याच्या समाधानात मार्गस्थ होतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजकाल हे शपथविधी सोहळे रंगलेले पाहायला मिळतात.

एखाद्या गावात एखाद्या समाजाची हजार-पाचशे एकगठ्ठा मते असतात; पण या समाजाचा प्रमुख सांगेल त्यालाच मतदान करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी टिकून असलेली दिसते. अशावेळी त्या समाजाच्या कारभार्‍याला भलताच मान मिळू लागतो. उमेदवारांचे प्रतिनिधी पावलोपावली या कारभार्‍यांच्या नाकदुर्‍या काढताना दिसतात. कारभार्‍याला काय हवे-नको ते सगळे पाहिले जाते, त्याच्या समाजाच्या काही मागण्या असतील, तर त्याही जागेवर पूर्ण केल्या जातात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आजकाल अशी बरीच कारभारी मंडळीही वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारामधून मिरवताना दिसत आहेत.

एखाद्या समाजाची विशिष्ट देव-देवता ही कुळस्वामी म्हणून परंपरागतपणे मान्यताप्राप्त असते. त्यामुळे त्या समाजाचे मतदान आपल्याच उमेदवाराला मिळविण्यासाठी त्या विशिष्ट देव-देवतांच्या आणाभाका घेण्याचीही ग्रामीण भागात परंपरा आहे. जगाचे व्यवहार कितीही डिजिटल झाले असले, तरी ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांना अजिबात तडे गेलेले नाहीत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून या निवडणुकीत एकगठ्ठा मतदानासाठी या श्रद्धास्थानांचा अत्यंत खुबीने वापर होताना दिसत आहे.

एखाद्या मतदार संघात एखाद्या विशिष्ट समाजातील विशिष्ट व्यक्तींना मोठा सामाजिक मान असतो. निवडणुकीच्या निमित्ताने अशा समाजमान्य व्यक्तींना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. मतासाठी देव-देवतांची शपथ घेणे, अंगारा किंवा भंडारा लावून मतदानाची हमी मिळविणे, कधी कधी जेवणाच्या ताटावरच खात्या भाकरीची शपथ घ्यायला लावणे, कधी लेकरा-बाळांची शपथ घालणे, असे प्रकार ग्रामीण भागात आजही सर्रासपणे चालताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या सगळ्यांचा नव्याने प्रत्यय येताना दिसत आहे.

Back to top button