नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली न्यायालयाने दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे.
राजधानी दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएस नेत्या के. कविता आणि आम आदमी पार्टीचे गोवा निवडणुकीचे कथित निधी व्यवस्थापक चनप्रीत सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीत अटक करण्यात आली होती. संबंधित धोरणही रद्द करण्यात आले. या धोरणाशी संबंधित प्रकरणात तिन्ही लोकांना दुरदृष्यप्रणालीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या उपस्थितीत अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या डॉक्टरांशी दररोज १५ मिनिटे वैद्यकीय सल्लामसलत करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळल्याच्या एक दिवसानंतरच न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला.
दिल्ली न्यायालयाने हेही निर्देश दिले की केजरीवाल यांना आवश्यक वैद्यकीय उपचार प्रदान केले जातील आणि कोणत्याही विशेष सल्लामसलतीची आवश्यकता असल्यास, तिहार तुरुंग अधिकारी एम्सच्या संचालकांमार्फत एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट यांचा समावेश असलेल्या वैद्यकीय मंडळाशी संपर्क करून सेवा घेऊ शकतात. दरम्यान, केजरीवाल यांना सोमवारी संध्याकाळी एम्सच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्सुलिनचा "कमी डोस" देण्यात आला. सोमवारी संध्याकाळी त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर हा डोस दिल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने सांगितले.