राहुल गांधींना केंद्रीय मंत्री पुरींनी सांगितला ‘बिनविरोध’चा इतिहास

राहुल गांधींना केंद्रीय मंत्री पुरींनी सांगितला ‘बिनविरोध’चा इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सुरत लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोमवार, २२ एप्रिल रोजी बिनविरोध झाल्‍याचे जाहीर करण्‍यात आले. यावर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्‍लाबोल केला. हा प्रकार म्‍हणजे जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे आहे. हे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या आरोपांना प्रत्‍युत्तर देत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधींना आजवरच्‍या लोकसभा निवडणुकीतील बिनविरोधचा इतिहास सांगितले आहे.

आजवर ३५ लोकसभा उमेदवार बिनविरोध निवडले गेले, यातील निम्‍मे काँग्रेसचेच

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्‍हटले आहे की, देशाच्या संसदीय इतिहासात संसदेत बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी ३५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ३५ उमेदवारांपैकी निम्मे उमेदवार काँग्रेसचे होते हे कळल्यावर त्यांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा टोलाही त्‍यांनी लगावला आहे.

१९८०मध्‍ये इंडिया आघाडीचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला आणि 2012 मध्ये डिंपल यादव यांचीही बिनविरोध निवड झाली होती. दुहेरी नागरिकत्वाची मागणी करणारे आणि गोव्यावर राज्यघटना लादण्यात आली असे म्हणणारे दक्षिण गोव्यातील त्यांच्या पक्षाचे उमेदवार विरिएटो फर्नांडिस यांचे विधान त्यांनी कदाचित ऐकले नसेल, असेही हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधींना सुनावले आहे.

काय म्हणाले हाेते राहुल गांधी?

सुरत निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं होतं की, 'हुकूमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार स्थापनेची निवडणूक नाही, तर ती देश वाचवण्याची निवडणूक आहे, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे.

सुरत लोकसभा जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्‍यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत उरले होते, त्यानंतर त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news