Lokshabha Elections 2024 : अमित शहांची संपत्ती ५ वर्षांत ३५ कोटींनी वाढली | पुढारी

Lokshabha Elections 2024 : अमित शहांची संपत्ती ५ वर्षांत ३५ कोटींनी वाढली

गांधीनगर : वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ३५ कोटी १८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. शहा यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे ६५ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवत असणाऱ्या शहा यांच्या शपथपत्रात मालमत्तेचा तपशील सादर करण्यात आला आहे. त्यानुसार अमित शहा व त्यांच्या पत्नी सोनल शहा यांची मालमत्ता ६५ कोटी ३८ लाख रुपयांची असून, त्यात गेल्या ५ वर्षांत म्हणजेच २०१९ नंतर त्यात ३५ कोटी १८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांची मालमत्ता ३० कोटी ४९ लाख रुपयांची होती.

शहा यांच्या जंगम मालमत्तेत रोख, बँक खाती, डिपॉझिट, सोने, चांदी आणि वारसा हक्काने आलेली मालमत्ता अशी एकूण २० कोटी २३ लाखांची मालमत्ता आहे. त्यात शहा यांच्याकडे १७ कोटी ४६ लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत, तसेच ७२ लाख ८७ हजार रुपयांचे सोन- चांदी आहे.

त्यांच्या पत्नी सोनल शहा यांच्याकडे २२ कोटी ४६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून, त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे एक कोटी १० लाख रुपयांचे दागिने आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये अमित शहा यांच्याकडे शेती, अर्धकृषी भूखंड, प्लॉट व घरे अशी वडनगर, दासकोराई, आश्रम रोड, थालतेज आणि गांधीनगर येथील सुमारे १६ कोटी ३१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. सोनल शहा यांच्याकडे विविध ठिकाणच्या निवासी मालमत्तांसह ६ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Back to top button