केजरीवालांना इन्सुलिन न दिल्याबद्दल आपचा हल्लाबोल मोर्चा | पुढारी

केजरीवालांना इन्सुलिन न दिल्याबद्दल आपचा हल्लाबोल मोर्चा

पुढारी वृत्तसेवा: केजरीवालांना इन्सुलिन न दिल्याबद्दल आपचा हल्लाबोल मोर्चा, तिहार तुरुंगाने दिले स्पष्टीकरण 
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन मिळावे या मागणीसाठी आपने तिहार तुरुंगाबाहेर रविवारी (२१ एप्रिल ) हल्लाबोल मोर्चा काढला. यावर तिहार तुरुंग प्रशासनाने ही स्पष्टीकरण देताना सांगितले की, “केजरीवालांना गंभीर समस्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.”
आप नेत्यांनी आणि समर्थकांनी रविवारी (२१ एप्रिल) तिहार तुरुंगाबाहेर हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आप नेत्या अतिशी यांनी हातात इन्सुलिन आणले होते.  यावेळी बोलताना अतिशी म्हणाल्या की, “केजरीवाल हे २२ वर्षांपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि गेल्या १२ वर्षांपासून ते इन्सुलिन घेत आहेत. कोणताही डॉक्टर असे म्हणणार नाही की ३०० शुगर लेव्हल असलेला रुग्ण इन्सुलिन घेणार नाही.”
यावर स्पष्टीकरण देताना तिहार तुरुंग प्रशासनाने सांगितले की, “एम्सच्या वरिष्ठ तज्ञांनी केजरीवाल यांना कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे आश्वासन दिले. तज्ञांनी त्यांना निर्धारित औषधे चालू ठेवण्याचा सल्ला दिला ज्यांचे नियमितपणे मूल्यांकन आणि पुनरावलोकन केले जाईल.” 
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवालांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे, त्यांनी तुरुंगात इन्सुलिन आणि दररोज 15 मिनिटे डॉक्टरांशी सल्लामसलत करता यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. या मागणीचा निकाल दिल्लीच्या राउज अवेन्यू न्यायालयाने राखून ठेवला. त्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते आक्रमक झालेत. केजरीवाल यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शनिवारी (२० एप्रिल) आपचे नेते सौरव भारद्वाज यांनी केला. त्यानंतर रविवारी (२१ एप्रिल) आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तिहार तुरुंगा बाहेर हल्लाबोल मोर्चा काढला. 

Back to top button