Indian Railway : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ९ हजार १११ रेल्वेगाड्यांच्या वाढविल्या फेरी | पुढारी

Indian Railway : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ९ हजार १११ रेल्वेगाड्यांच्या वाढविल्या फेरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेता, रेल्वे विभागाने महाराष्ट्रातील रेल्वेगाड्यांच्या फेरी वाढवल्या आहेत. पश्चिम क्षेत्रात १८७८ गाड्यांच्या फेरी वाढविण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेऊन रेल्वेने तब्बल ९ हजार १११ गाड्यांच्या फेरी वाढविल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २,७४२ गाड्यांच्या अधिक फेरी आहेत. गेल्यावर्षी एकूण ६,३६९ गाड्यांच्या फेरी वाढविण्यात आल्या होत्या.

रेल्वे विभागाने प्रमुख मार्गांवर अतिरिक्त गाड्या सुरू केल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने सर्वच झोनमध्ये अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

पीआरएस प्रणाली, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची संख्या, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि रेलवे इंटीग्रेटेड हेल्पलाइन नंबर १३९ वरून मिळालेल्या संपूर्ण माहितीच्या आधारावर रेल्वे गाड्यांच्या फेरी वाढविण्यासह अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. उन्हाळ्यात प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Back to top button