नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एअर इंडिया कंपनीने ३० एप्रिलपर्यंत इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे रद्द केली. इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणावाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनीने हा निर्णय घेतला. युद्धामुळे तेल अवीवला जाणारी आणि तिकडून येणारी दोन्ही बाजूंची विमाने रद्द करण्यात आली असल्याचे एअर इंडियाने सांगितले.
इराण-इस्त्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीच्या आधारे एअर इंडियाने या अगोदर १४ एप्रिल (रविवार) तेल अवीवची विमाने रद्द केल्याचे सांगितले होते. आता परिस्थिती जास्तच गंभीर होत आहे. हे पाहून पुन्हा कंपनीने शुक्रवारी (१९ एप्रिल) सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करुन ३० एप्रिलपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केले.
या पोस्टमध्ये एअर इंडियाने सांगितले की, "आम्ही सतत परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत आणि आमच्या प्रवाशांना मदत करत आहोत. ज्यांनी या कालावधीत तेल अवीव आणि तेथून प्रवासासाठी बुकिंगची केली आहे, त्यांना रीशेड्युलिंग आणि तिकीट रद्द करण्याच्या शुल्कावर एक वेळ सूट दिली आहे. आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे."
याचबरोबर कंपनी ग्राहकांना अधिक माहिती देण्यासाठी २४ तास कटीबद्ध असल्याचे सांगितले असून, प्रवाशांनी ०११-६९३२९३३३/ ०११-६९३२९९९९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच यासंबंधीची अधिक माहिती कंपनीच्या airindia.com या संकेतस्थळावरही मिळेल.
इस्त्रालयवर हमासच्या हमल्यामुळे ७ ऑक्टोंबर २०२३ पासून सर्व विमान उड्डाणे रद्द होती. त्यानंतर ३ मार्च २०२४ ला पाच महिन्यानंतर एअर इंडियाने विमानसेवा सुरळीत सुरु केली, परंतू पुन्हा तणाव वाढल्यामुळे विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाला घ्यावा लागला.