नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रतिक्षेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, हा तिढा अखेर सुटला आहे. गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणीही करण्यात येत होती. दुसरीकडे नारायण राणेंनीही सभांचा धडाका लावला होता. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तेरावी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर करण्यात आली. नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत होणार आहे. विनायक राऊत या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकसभा लढणार आहेत.
अगदी सुरुवातीपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे लढतील अशा चर्चा होत्या. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या दोन-तीन उमेदवारी याद्या जाहीर झाल्या. मात्र त्यात नारायण राणे यांचे नाव नव्हते. अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही उमेदवारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. नारायण राणेंची राजकीय सुरुवात शिवसेनेपासूनच झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास केला तर विनायक राऊत मात्र सुरुवातीपासून शिवसेनेत राहिले. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले आणि केंद्रीय मंत्रीही बनवले तर विनायक राऊत २०१४ पासून दोनदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार म्हणूनही काम केले आहे.