नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
कोरोना विरोधातील लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापता तर मृत्यू प्रमाणपत्रांवरही त्यांचा फोटो छापायची जबाबदारी घ्यावी लागेल, असे मत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार घेत लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला गेला असेल मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? असा सवाल अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी, एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याही मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? राजकारण करायची वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मग या हिशोबाने सर्वात जास्त मृत्यू प्रमाणपत्रांवर महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंचे फोटो लागतील,असे सुजय विखे म्हणाले.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या संकटाविषयी चर्चा करण्यात आली. सुजय विखे यांनी ओमायक्रॉनपेक्षा व्हायरल बातम्याच जास्त धोका असल्याचे मत व्यक्त केले. देशातील लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला जात असेल तर राज्यात घटलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो लावायला हवा असे देखील ते म्हणाले.
ज्या पद्धतीने ओमायक्रॉनवर चर्चा केली जात आहे त्याबाबत आधी समजून घेतले पाहिजे. कुठलाही संसर्ग आला तर त्याचे म्युटेशन होते. याआधीही अल्फा, डेल्टा असे व्हेरिएंट आले आहेत आणि ओमायक्रॉन त्यातील एक आहे. म्युटेशन का होते आणि तो अतिशय धोकादायक का आहे याच्यावर दुर्दैवाने कोणाचा अभ्यास नाही. जोपर्यंत जागतिक लसीकरण होत नाही तोपर्यंत असे व्हेरिएंट येतच राहणार आहेत.ओमायक्रॉनने काय धोका होईल यावर कोणताही अभ्यास झालेला नाही.भीती घालण्यासाठी नव्या व्हेरिएंटच्या नावाची चर्चा होते, असे ते म्हणाले.
कोरोना काळातल्या कामासाठी महाराष्ट्रातल्या सरकारच्या तिन्ही पक्षांच्या लोकांना भारतरत्न देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही लस सरकारने विकत घेतलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बुस्टर डोसबाबत काही परवानगी दिलेली नाही. तरीही सरकारवर आरोप केले जात आहे. पुढचा धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जाते. त्यातील किती लहान मुले पॉझिटिव्ह झाली? सर्व विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे. गुगलमध्ये सर्च करुन भाषण करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे,असे सुजय विखे म्हणाले.
हे ही वाचलं का ?