ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात २८ संशयित; रुग्णांचे नमुने तपासणीला : राजेश टोपे | पुढारी

ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात २८ संशयित; रुग्णांचे नमुने तपासणीला : राजेश टोपे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात कोविड- १९ विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने बाधित झालेला अद्याप एकही रुग्ण नाही. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार सतर्क असून १० नोव्हेंबरपासून राज्यातील मुंबई विमानतळावर येणाऱ्या ८६१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तीन प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोबतच, या तिघांसह त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर २८ संशयितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरियंटचे ३० देशांत रुग्ण आढळले आहेत. त्याची संसर्गक्षमता पूर्वीच्या व्हेरियंटच्या तुलनेत खूपच अधिक आहे. असे असले तरी ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य आहेत. कोणालाही तीव्र लक्षणे आढळून येत नाहीत. अगदी ऑक्सिजन लावण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्ट केले.

राजेश टोपे म्हणाले की, कर्नाटक राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेले दोन नागरिक आढळले आहेत. त्यापैकी पहिल्या नागरिकांच्या संपर्कातील २०० आणि दुसऱ्या नागरिकांच्या संपर्कातील १७५ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल अद्याप आलेले नाहीत.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तणूक पाळण्यावर भर द्यावा. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घ्यावेत, राज्यात पहिला डोस घेणारे नागरिकांचे प्रमाण ८० टक्केहून अधिक आहे. दुसरा डोस घेणारे नागरिकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत. ज्यामुळे आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल सोबत सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होईल.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत १२ तर पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचे अहवाल लवकरच मिळतील. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आहेत. काही शासकीय दवाखान्यात अशा प्रकारच्या प्रयोगशाळा विकसित करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही टोपेंनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button