मद्यधोरण गैरव्यवहार केजरीवाल यांच्या अंगलट | पुढारी

मद्यधोरण गैरव्यवहार केजरीवाल यांच्या अंगलट

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली :

राजधानी दिल्लीत विधानसभा आणि महानगरपालिकेत आम आदमी पक्षाची (आप) सत्ता आहे तर सर्व सातही लोकसभा क्षेत्र मात्र भाजपच्या ताब्यात आहेत. काँग्रेस पक्षाची ना लोकसभेत ना विधानसभेत ना महानगरपालिकेत सत्ता आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हाती सर्व सातही जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यावेळी लढत ही तिरंगी होती ज्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप असा सामना होता. यावेळी आप आणि काँग्रेस यांची आघाडी आहे आणि या दोन्ही पक्षांनी भाजप विरुद्ध एकत्र येत दंड थोपटले आहेत.

आगामी लोकसभेत आप चार जागा तर काँग्रेस पक्ष तीन जागा लढवत आहे. त्यांच्या विरूद्ध भाजप सर्व सातही जागा लढत आहे. आपने आपले चारही उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. तर मित्रपक्ष काँग्रेसनेही आपले उमेदवार दीर्घकाळ विचार मंथन केल्यानंतर रविवारी (१४ एप्रिल) जाहीर केले. दुसरीकडे भाजपने खूप आधीच आपले सातही उमेदवार जाहीर केले आहेत. ही सगळी समीकरणे आपल्याला ठाऊक आहेतच. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील मध्यधोरण गैरव्यवहार प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी आधीच आपचे प्रमुख नेते अटकेत असताना २१ मार्चला ईडीने पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदकेजरीवाल यांनाही अटक केली. आपची स्थापनाच मुळात भ्रष्टाचार विरोधी पक्ष किंवा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून जन्माला आलेला पक्ष या आधारावर झाली. मात्र त्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप झाले. केवळ आरोप झाले नाही तर या आरोपामुळे आम पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात देखील जावे लागले. त्यातच केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी बुधवारी आपल्या मंत्रीपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. “पक्ष भ्रष्टाचारात बुडाला आहे. त्यात मी राहु शकत नाही. केजरीवाल म्हणाले होते ‘राजनीती बदलेगी तो देश बदलेगा,’ मात्र आजराजकारण नाही तर राजकारणी बदलले आहेत. पक्षात दलित नेत्यांचा आदर नाही. सर्व दलितांना फसवणूक झाल्याचे वाटत आहे.” अशी उद्वीग्न प्रतिक्रिया राजीनाम्यानंतर आनंद यांनी दिली.त्याचाही परीणाम आपवर निवडणुकीत होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांमध्ये आपद्वारे दिल्ली महापालिकेत, दिल्ली विधानसभेत सत्ता असताना शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात चांगली कामे झाल्याचा दावा केला जातो. यामुळेच दिल्लीच्या जनतेने केजरीवाल सरकारला पुन्हा एकदा संधी दिली. परंतु ज्या केजरीवाल सरकारने शैक्षणिक, आरोग्याच्या क्षेत्रात चांगल्या सेवा दिल्या म्हणून खुश असणारी दिल्लीकर जनता मात्र मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे नाराज असल्याचेही पाहायला मिळते. बाकी गोष्टी चांगल्या केल्या ते ठीक आहे. मात्र मद्यधोरणात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि नेत्यांना झालेल्या अटका हे दिल्लीतील लोकांना रुचलेले दिसत नाही. हाच मुद्दा आप आपल्या पद्धतीने तर भाजप आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. “आम्हालाजाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्यात आले. प्रत्यक्षात मद्यधोरण गैरवहाराशी आपच्या नेत्यांचा काहीही संबंध नाही,” असा दावा आप करत आहे. दुसऱ्या बाजुला भाजप मात्र या मुद्द्यावरून आपवर जोरदार प्रहार करत आहे. “अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, भ्रष्टाचारविरोधी गप्पा मारणाऱ्या पक्षाचे हेच खरे रूप आहे. केजरीवाल सरकारने लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे” अशी भूमिका भाजपची आहे.

दोन राजकीय पक्षांमध्ये असलेली ही लढाई असली तरी काँग्रेससाठी मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण अडचणीची गोष्ट आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपसह आपवरही जळजळीत टीका केली होती. त्यानंतर ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत आघाडी करणे या गोष्टीवरून देखील भाजप दिल्लीत आक्रमक झाली आहे. तर अनेक गोष्टींमुळे केजरीवालांसाठी सकारात्मक असलेली दिल्लीची जनता मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणावरून नाराज दिसत आहे. परंतु जनतेच्या मनात काय आहे यासाठी २५ मेला मतदानातून आपला कौल देणार आहेत आणि हा कौल कुणाच्या बाजुने आणि कुणाच्या विरोधात असेल हे ४ जूनला मतमोजणीत हे स्पष्ट होणार आहे.

Back to top button