रावेरमध्ये पवारांकडून पुन्हा ‘मराठा कार्ड’ | पुढारी

रावेरमध्ये पवारांकडून पुन्हा ‘मराठा कार्ड’

मिलिंद सजगुरे

तीन आठवड्यांपूर्वी महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपच्या रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून रावेर मतदारसंघात महाविकास आघाडी नेमकी कोणाला मैदानात उतरवते, या प्रश्नाचे उत्तर अखेर बुधवारी (दि. 10) मिळाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या रूपाने शरद पवार यांनी रावेरमध्ये पुन्हा ‘मराठा कार्ड’ खेळल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप नेतृत्वाने अव्हेरले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट चोखाळलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राजकीयद़ृष्ट्या भाजपच सुरक्षित वाटल्याने सध्या ते ‘कमळा’भोवती रुंजी घालत आहेत. काही दिवसांतच त्यांची घरवापसी होणे मुक्रर आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा या गेल्या दोन टर्मपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. एकनाथ खडसेंनी वेगळी वहिवाट धरल्याने यावेळी रक्षा यांना उमेदवारी मिळण्याची उमेद कमीच होती. त्यांच्याऐवजी भाजपने इतर दोन-तीन नावांची पेरणी करूनही ठेवली होती. तथापि, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खानदेश मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाथाभाऊंनी रावेरमधून निवडणूक लढवावी, अशी आग्रही सूचना केल्यामुळे भाजप सावध पवित्र्यात आला. रक्षा यांचे नाव बाजूला टाकण्यात गर्क असलेल्या भाजपमधील मंडळींना नाथाभाऊंच्या राजकीय कोंडीसाठी रक्षा यांच्या रूपातील हत्यार बाहेर काढण्याविना तरणोपाय नाही, असा साक्षात्कार झाला. त्याची परिणती म्हणून अखेर रावेरच्या मैदानात त्यांनाच उतरवण्यास नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवला.

रावेर मतदारसंघात आजवर भाजपानुकूल वातावरण राहिले आहे. खडसेंच्या प्रस्तावित भाजप पुनर्प्रवेशामुळे पक्षाची इथली तटबंदी भक्कम होणार आहे. ही स्थिती पाहता महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट द्यावे, यावर शरद पवार यांचे मंथन सुरू होते. गतवेळचे उमेदवार रवींद्रभैया पाटील हेच पवारांची पसंती बनतील, अशी अटकळ असतानाच उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी सलग दुसर्‍यांदा मराठा कार्ड खेळण्याचा प्रयोग केला आहे. लेवा पाटील आणि गुजर या समाजांचे दखलपात्र मतदार असलेल्या रावेरमध्ये मतदार नेमके कोणाला पसंती देतात, याकडे उभ्या खानदेशाचे लक्ष लागून राहणार आहे.

दीड महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी!

मूळ उद्योजकीय पिंड असलेल्या श्रीराम पाटील यांनी रावेरची राजकीय गणिते पाहता भाजपच्या कमळावर स्वार होण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचे सोपस्कार पार पडल्यानंतर रावेरमध्येे आपण पक्षाचे उमेदवार असू, या आडाख्यानुसार त्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटले होते; मात्र तशी शक्यता संपुष्टात आल्याने अवघ्या दीडच महिन्यात पाटलांनी पवारांच्या पक्षासोबत दोस्ताना करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाण्याच्या चर्चाही जोरात होत्या. कुठे तरी माशी शिंकली आणि पाटील यांना ‘घड्याळा’हून ‘तुतारी’ लाभदायी वाटली आणि लोकसभा उमेदवारीतून ती बाब फलद्रूपही झाली. आता लोकसभेचे मैदान मारताना रक्षा खडसेंची विजयी घोडदौड रोखण्यासाठी पाटील कोणती रणनीती अवलंबतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Back to top button