उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यात कडवी झुंज | पुढारी

उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यात कडवी झुंज

हरिष पाटणे

संपूर्ण देशाचे लक्ष ज्या क्रांतिकारी सातारा लोकसभा मतदार संघाकडे कायम असते, अशा ऐतिहासिक मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीने अद्यापही उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली नसली, तरी महायुतीकडून उदयनराजेच उमेदवार असतील असे सांगितले जात असल्याने, या मतदार संघात काट्याची लढत पाहायला मिळेल.

1952 पासून सातारा लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ या मतदार संघाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत हा मतदार संघ 1996 चा अपवाद वगळता कायम काँग्रेसचा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघावर शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव व पगडा राहिला. 1999 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत पाठवला. 1999, 2004 या साली लक्ष्मणराव पाटील यांना व 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातार्‍यातील जनतेने राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार केले. 2019 साली राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार व शरद पवारांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर उभे असलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. मोदी लाटेतही हा मतदार संघ शरद पवारांबरोबर राहिला.

सातारा लोकसभा मतदार संघात 2024 च्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुतीकडून या मतदार संघात राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. अद्यापही महायुतीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच उदयनराजेंनी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन उदयनराजेंचे मेळावे होत आहेत. जुन्या चुका दुरुस्त करून उदयनराजे बेरीज करताना दिसत आहेत.

आ. शिवेंद्रराजे भोसले व उदयनराजे यांचे अजिबात पटत नव्हते. मात्र, शिवेंद्रराजेंच्या वाढदिवशी सुरुचिवर जाऊन उदयनराजेंनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि जाहीरपणे व्यक्त केलेली दिलगिरी यामुळे दोन्ही भावांमध्ये पुन्हा एकदा सलोख्याचे वातावरण तयार झाले आहे. शिवेंद्रराजेंच्या पुढाकाराने अजिंक्यतारा कारखान्यावर झालेला महायुतीचा मेळावा दोन्ही भावांच्या मनोमीलनाची साक्ष देऊन गेला. उदयनराजेंसाठी ही सर्वांत जमेची बाजू ठरली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेली भाजप उदयनराजेंच्या विजयासाठी झटून काम करताना दिसत आहे. मात्र, महायुतीचे अन्य घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट, रिपाइं अद्यापही प्रचारात सक्रिय नाहीत. उमेदवार निश्चिती झाल्याशिवाय प्रचारात भाग न घेण्याचे घटकपक्षांचे धोरण आहे.

उदयनराजेंच्या विरोधात शरद पवार कोणाला उतरवणार, याविषयी बर्‍याच अटकळी सुरू होत्या. दस्तुरखुद्द शरद पवारच लढणार, अशीही चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवायला नकार दिल्यानंतर बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे हे दोनच खमके पर्याय शरद पवारांकडे होते. बाळासाहेब पाटील यांनीही साखर कारखान्याचे कारण सांगून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मात्र निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे जाहीर केले. शरद पवारांनाही शशिकांत शिंदेंनाच तिकीट देण्याची इच्छा होती. उदयनराजेंच्या विरोधात भक्कम पर्याय पवारांना हवा होता. शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्याने सातारा लोकसभा मतदार संघातील हवा गरम झाली आहे.

शशिकांत शिंदे हे माथाडींचे नेते आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 1999, 2004 या विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जावलीतून जिंकल्या. 2009, 2014 या दोन विधानसभा निवडणुका त्यांनी कोरेगावमधून जिंकल्या. 2009 साली त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत केले. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. हेच शशिकांत शिंदे उदयनराजेंविरोधात उभे ठाकले आहेत. उदयनराजेंचा मोठा चाहता वर्ग आहे. तसेच फॅन फॉलोईंग शशिकांत शिंदे यांचेही आहेत. दोघेही मास लीडर म्हणून ओळखले जातात. दोघेही मसल लीडर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील लढाई मास आणि मसल लीडर्सची आहे. ही लढाई अत्यंत अटीतटीची होणार आहे. शरद पवारांविषयीची मतदार संघामध्ये असलेली सहानुभूती, काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेची पवारांच्या राष्ट्रवादीला मिळत असलेली साथ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्रचार यंत्रणेतला सहभाग आणि स्वत: शशिकांत शिंदे यांचा जिल्ह्यात असलेला जनसंपर्क राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू आहेत.

महायुतीची बुथ मॅनेजमेंट राष्ट्रवादीपेक्षा मजबूत आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपने ज्या पद्धतीने बुथवार नियोजन केले आहे, ते उदयनराजेंच्या पथ्यावर पडेल. नेमकी इथेच राष्ट्रवादीची बाजू लंगडी आहे. राष्ट्रवादी अंतर्गत झालेले मतभेद त्यामुळे बुथवार नियोजनात राष्ट्रवादी सध्या तरी भाजपच्या तुलनेत मागे आहे. मात्र, निवडणूक अजून तीन आठवड्यांवर असल्याने वेगात माहीर असलेले शशिकांत शिंदे बुथ मॅनेजमेंटही अ‍ॅक्टिव्ह करू शकतात.

भाजपने उदयनराजेंची उमेदवारी अद्यापही जाहीर न केल्याने महायुतीत अस्वस्थता आहे महायुतीसाठी ही तोट्याची बाजू आहे. तातडीने उमेदवारी जाहीर झाली, तर महायुतीतील अन्य घटक पक्षही प्रचार यंत्रणेत सहभागी होऊ शकतात. सध्यातरी दोन्ही बाजूने आक्रमक प्रचार होताना दिसत नाही. मात्र, खरोखरच उदयनराजेेंविरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढाई झाली, तर प्रचार व निवडणूक अत्यंत टोकाला जाणार, हे निश्चित आहे. मास आणि मसल लीडर्स निवडणुका झुंजीसारख्या खेळतात. उदयनराजे व शशिकांत शिंदे हे दोघेही महाराष्ट्रात आक्रमक लीडर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे क्रांतिकारकांच्या या सातार्‍याची ही लढाई अटीतटीची व देशाचे लक्ष वेधून घेणारी असेल.

उदयनराजेंची बलस्थाने….

* उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज
* तरुणाईचे उदयनराजे हे मोठे आकर्षण
* प्रचंड मोठे फॅन फॉलोईंग
* नरेंद्र मोदींचा करिष्मा उदयनराजेंची जमेची बाजू
* महायुतीचे मतदार संघात स्ट्राँग नेटवर्क
* शिवेंद्रराजेंशी झालेले मनोमीलन

शशिकांत शिंदेंची बलस्थाने….

* माथाडी कामगारांची मोठी ताकद
* शरद पवारांविषयीची सहानुभूती ही जमेची बाजू
* मतदार संघ कायम राष्ट्रवादीकडे राहिला, हे त्यांच्या पथ्यावर
* संपूर्ण सातारा जिल्ह्यात जनसंपर्क
* काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचारातला सक्रिय सहभाग

उदयनराजेंची फिनिक्स भरारी...

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी सातत्याने राजकारणात संघर्ष केला आहे. सहजपणे त्यांना कधीच काही मिळालेले नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभवही त्यांच्या वाट्याला आलेला आहे. त्याचवेळी सलग तीनवेळा सातारा लोकसभा मतदार संघाचे ते खासदारही राहिले आहेत. पोटनिवडणुकीतील पराभवानंतरही उदयनराजेंनी लोकांना भेटणे थांबवले नाही. त्यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी केले, त्यांना त्यांना उदयनराजे विसरत नाहीत. आजही त्यांचा चाहता वर्ग उदंड आहे. उदयनराजेंचे हे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर नसली, तरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उदयनराजेंनी भरारी घेतली आहे.

पवारांवर जेव्हा जेव्हा वेळ तेव्हा तेव्हा शशिकांत शिंदे

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना उमेदवाराची गरज भासली, तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला शशिकांत शिंदेच धावून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 ला शरद पवारांकडे जावली विधानसभा मतदार संघात स्ट्राँग उमेदवार नव्हता. बाळासाहेब भिलारेंसह 18 जण तेव्हा निवडणुकीसाठी इच्छुक होते. शशिकांत शिंदे त्या काळात नवी मुंबईत माथाडींचे नेतृत्व करत होते. पवारांनी जावली खोर्‍यातील माथाडींची संख्या लक्षात घेऊन शशिकांत शिंदेंना जावलीत आणले. नवख्या शशिकांत शिंदेंनी तेव्हा शिवसेनेच्या सदाभाऊ सपकाळ यांचा पराभव केला.

2009 साली लोकसभा व विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना झाली. तेव्हा पुन्हा शशिकांत शिंदेंच्या पुनर्वसनाचा विषय आला. शरद पवारांच्या विरोधात तेव्हा कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार असलेल्या शालिनीताई पाटील आक्रमक होत्या. पवारांना शालिनीताईंना पराभूत करायचे होते. अशावेळी पवारांना जे नाव सुचले, ते शशिकांत शिंदे यांचेच. स्वत:चा हक्काचा मतदार संघ सोडून कोरेगावात जाऊन शशिकांत शिंदे यांनी शालिनीताई पाटील यांना पराभूत केले. आता पुन्हा जेव्हा शरद पवारांना सगळे सोडून गेले, तेव्हा शशिकांत शिंदे मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सातारा मतदार संघातून लढायला कोणच तयार नाही असे चित्र दिसू लागले, तेव्हा धाडसी शशिकांत शिंदेंनीच पुन्हा एकदा शरद पवारांसाठी रणांगणात उडी घेतली आहे.

Back to top button