लालू-पप्पू यादव यांच्यातील हाडवैरामुळे पूर्णियाची देशभर चर्चा

लालू-पप्पू यादव यांच्यातील हाडवैरामुळे पूर्णियाची देशभर चर्चा
Published on
Updated on

कधी काळी एकमेकांचे खास मित्र असलेले लालूप्रसाद यादव आणि राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यातील मैत्रीचे रूपांतर सध्या शत्रुत्वात झाले आहे. मुलगा तेजस्वी याच्या राजकीय भवितव्यासाठी लालूंनी पप्पू यांना पूर्णियातून तिकीट मिळू दिले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ देशभर चर्चेत आहे. या मतदार संघात बाहुबली नेता पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून राजदला आणि पर्यायाने लालूप्रसाद यांना आव्हान दिले आहे.

भारतीय राजकारणातील घराणेशाही हा विषय नवा नाही. कोणत्याही कुटुंबात लहान मुलाला 'पप्पू' या नावाने संबोधले जाते. सध्या याच पप्पूवरून राजकीय मैदानात वेगळेच द्वंद्व पाहायला मिळत आहे. यामध्ये पहिले नाव म्हणजे बिहारचे बाहुबली नेते राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव आणि दुसरे म्हणजे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी. पप्पू या नावाने त्यांची अनेकदा खिल्ली उडविली गेली आहे. राजकारणातील वादग्रस्त नेते लालूप्रसाद यादव यांनी घराणेशाहीच्या रिवाजानुसार आपले चिरंजीव तेजस्वी यांना स्वतःचे उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले असून, त्यांना बिहारचे मुख्यमंत्रिपद कधी मिळणार, याची चिंता लालू यांना लागली आहे. नेमकी अशीच स्थिती महाराष्ट्रातही पाहायला मिळते. शिवसेनेची शकले उडाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा हात हातात घेतला. सध्या त्यांनाही आदित्य ठाकरे मुख्यमंत्री कधी होणार, याचे वेध लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परिस्थिती काही वेगळी नाही. कन्या सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याची चिंता पवार यांना लागली आहे. यातील सर्वात लक्षवेधी घटना बिहारमध्ये घडताना दिसत आहेत.

पूर्णिया मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत

बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. तेथील नेते पप्पू यादव यांना लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांनी राजकीय धडे दिले. एका जमीनदार कुटुंबात जन्म झालेले पप्पू यादव यांच्याकडे साधनांची कमतरता कधीच नव्हती. 1980 पासून लालूप्रसाद आणि पप्पू यादव मित्र आहेत. लालूप्रसाद यांच्यासाठी मतपेट्या चोरल्याचा आरोप पप्पू यांच्यावर तेव्हा झाला होता. तेव्हापासून ते बाहुबली नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. 1990 मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून बिहार विधानसभेत पोहोचले. नंतर त्यांचे पुढील लक्ष्य लोकसभा होते. त्यावेळी त्यांची गुंडगिरी एवढी कळसाला पोहोचली होती की, त्यांचे नाव घ्यायलाही लोक घाबरत असत. यादरम्यान ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले. नंतर कम्युनिस्ट नेते अजित सरकार यांच्या हत्याप्रकरणात पप्पू यांना सतरा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. दीर्घकाळ ते तुरुंगात होते. यादरम्यान त्यांची खासदारकीही रद्द झाली. अखेर 2013 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांना दोषमुक्त केले. यानंतर त्यांनी 2014 मध्ये मधेपुरातून राजदच्या तिकिटावर पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.

स्वतःच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना

राजदच्या तिकिटावर जिंकल्यानंतर पप्पू यादव यांचा अडसर लालूप्रसाद यांना वाटू लागला. त्यामुळे या दोघांत वितुष्ट यायला सुरुवात झाली. तेजस्वी यांनाही पप्पू यादव यांचे यश अस्वस्थ करू लागले. या वादातून पप्पू यांनी स्वतःचा 'जन अधिकार पक्ष' स्थापन केला. 2019 मध्ये याच पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या पदरी हार पडली. यानंतर त्यांनी गरिबांचा तारणहार अशी स्वतःची प्रतिमा बनविण्यास सुरुवात केली. 'द्रोहकाल का पथिक' या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्रही प्रसिद्ध केले. दिल्लीत त्यासाठी त्यांनी भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणला होता.

या आत्मचरित्रात त्यांनी लालूप्रसाद यांच्या राजकीय कारकीर्दीचे वाभाडे काढले आहेत. ते लिहितात, बिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर लालूप्रसाद यांनी गरिबांच्या कल्याणाचा फक्त प्रचार केला. वास्तवात त्यांना सत्ता केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी राबवायची होती. चारा घोटाळ्यात तुरुंगात गेल्यानंतर पत्नी राबडीदेवी यांना त्यांनी मुख्यमंत्री केले. पाठोपाठ आपल्या मुली आणि मुलगे अशा सर्वांचे राजकीय पुनर्वसन करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. एवढेच नव्हे तर स्वतःची एकाधिकारशाही शाबूत रहावी यासाठी लालूप्रसाद यांनी राज्यातील अन्य पक्ष तोडण्याची जबाबदारी स्वतःच्या दोन मेहुण्यांसह काही निवडक नेत्यांवर सोपविली होती. खून, बलात्कार, अपहरण, खंडणी, चोर्‍या करण्यात हे सर्व जण कुप्रसिद्ध होते. यावेळी पप्पू यादव यांनी पूर्णियातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांना कितपत यश मिळेल, हे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news