

कर्नाटकातील 28 मतदारसंघांपैकी 11 मतदारसंघांमध्ये इतर जिल्ह्यांतून स्थलांतरीत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यातील तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी जातनिहाय मते, प्रभाव अशा निकषांसह संबंधित नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात होणारा विरोध लक्षात घेून ही निवड केली आहे.
ज्येष्ठ भाजप नेते जगदीश शेट्टर हे मूळचे धारवाड जिल्ह्यातील आहेत. त्यांना बेळगावातून उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी चिकोडीतील काँग्रेस उमेदवार आहेत. त्या मूळच्या गोकाकमधील आहेत. शोभा करंदलाजे मूळच्या मंगळुरातील असल्या तरी त्यांना बंगळूर उत्तरमधून उमेदवारी मिळाली आहे. याआधी त्या बंगळूर उत्तर मतदारसंघात येणार्या यशवंतपूर विधानसभा मतदारसंघात आमदारपदी निवडून आल्या होत्या. राजाजीनगरात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांना उडपी-चिक्कमगळूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. आता त्या बंगळूर उत्तरमधून लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे प्रा. एम. व्ही. राजीवगौडा लढत आहेत. तेसुद्धा कोलार जिल्ह्यातील आहेत. बंगळूर ग्रामीणमध्ये डॉ. सी. एन. मंजुनाथ भाजप उमेदवार आहेत. पण, ते मूळचे हासनमधील चन्नरायपट्टणचे आहेत.
मंड्यामध्ये भाजप-निजद युतीचे उमेदवार एच. डी. कुमारस्वामी निवडणूक लढवत आहेत. त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र रामनगर आहे. चिक्कबळ्ळापूरचे काँग्रेस उमेदवार रक्षा रामय्या बंगळूर शहरातील आहेत. गीता शिवराजकुमार शिमोग्याच्या काँग्रेस उमेदवार आहेत. हे त्यांचे माहेर आहे. त्या मूळच्या चामराजनगर जिल्ह्यातील असून त्या बंगळुरात राहतात.
बागलकोटच्या काँग्रेस उमेदवार संयुक्ता पाटील मंत्री शिवानंद पाटील यांच्या कन्या आहेत. त्या मूळच्या विजापूर जिल्ह्यातील आहेत. तुमकूरचे भाजप उमेदवार व्ही. सोमण्णा मूळचे कनकपूरचे आहेत. पण, बंगळूरमध्ये ते नगरसेवक, आमदार म्हणून निवडून आले होते. कोलारचे काँग्रेस उमेदवार के. व्ही. गौतम हे बंगळूर शहर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बंगळूर मध्यचे ते काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते. चित्रदुर्ग इथे दोन्ही उमेदवार आयात आहेत. इथले काँग्रेसचे उमेदवार बी. एन. चंद्रप्पा मूळचे मुडिगेरेतील आहेत. भाजप उमेदवार गोविंद कारजोळ हे बागलकोटचे आहेत.