Gold Prices Today | सोने ७२ हजार पार, चांदीही चमकली! दरवाढीचे कारण काय?

Gold prices Today
Gold prices Today
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सोने दराने बुधवारी (दि.१०) सर्वकालीन उच्चांक गाठला. आज सोन्याचा दर २१६ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७२,०४८ रुपयांवर पोहोचला. चांदीही महागली आहे. चांदीचा दर ३६८ रुपयांनी वाढून प्रति किलो ८२,४६८ रुपयांवर गेला. पुढील काही दिवसांत सोने-चांदी दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold Prices Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर ७२,०४८ रुपये, २२ कॅरेट ६५,९९६ रुपये, १८ कॅरेट ५४,०३६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४२,१४८ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८२,१०० रुपयांवरून ८२,४६८ रुपयांवर खुला झाला.

२०२४ मध्ये ८,७०० रुपयांची वाढ

२०२३ मध्ये सोन्याच्या दरात ८ हजार रुपयांहून अधिक वाढ झाली होती. तर २०२४ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे ८,७०० रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ कशामुळे?

सोने ही एक लवचिक आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात. कारण बॉण्ड्ससारख्या उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेपेक्षा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होतात. गुंतवणूकदार सोन्याकडे महागाईविरूद्ध बचाव म्हणूनदेखील पाहतात. तसेच मध्यवर्ती बँका सोन्याकडे दीर्घकालीन मूल्याचे भांडार आणि आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशांततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पाहतात. पीपल्स बँक ऑफ चायना ने मार्चमध्ये सलग १७ व्या महिन्यात सोने खरेदी केले. त्यांच्या सोने साठ्यात १,६०,००० औंसची वाढ झाली आहे. यामुळे त्यांचा सोने साठा ७२.७४ दशलक्ष ट्रॉय औंसवर गेला आहे, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Gold Prices Today)

गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्तेचे मूल्यांकन आणि इक्विटीच्या किमतींमध्ये झालेली घसरण यामुळे चीनी गुंतवणूकदार पर्यायी मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. मध्यवर्ती बँकांच्या खरेदीमुळे २०२२ पासून सोन्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. हेही दरवाढीचे कारण आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news