Lok Sabha Election 2024 : हरियाणात जाट मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हरियाणात जाट मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर

- सुनील डोळे

हरियाणा म्हटले की, देवीलाल, भजनलाल आणि बन्सिलाल हे हरीचे तीन लाल आठवतात. यातील भजनलाल यांनी तर कमालच केली होती. त्यांनी एका रात्रीत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून स्वतःकडे मुख्यमंत्रिपद राखण्याची किमया साधली होती. आयाराम-गयाराम ही राजकीय संस्कृती हरियाणाची खासियत.

याच छोटेखानी राज्यात तेव्हापासून पक्षांतराचे पेव फुटले. नंतरच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. राजधानी दिल्लीला खेटून असलेल्या या राज्यात यावेळी अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिसार, कर्नाल, सोनिपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुरुग्राम आणि फरिदाबाद या दहा लोकसभा मतदारसंघांत एकाच टप्प्यात 25 मे रोजी मतदान होत आहे. अर्थात, त्यानंतरही तेथील नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना उसंत मिळणार नाही. कारण, पाठोपाठ 90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेची निवडणूकही होऊ घातली आहे. त्यामुळे सैनी यांच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे.

आधीचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपने यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूई नेतृत्वाच्या जोरावर येथे भाजपने सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. विरोधी काँग्रेसच्या पदरी दारुण निराशा पडली. यावेळी भाजपने ऐनवळी खट्टर यांना हटवून सैनी यांच्याकडे सूत्रे सोपविण्याची चाणाक्ष खेळी केली आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी कौल हा घटक जवळपास मोडीत निघाल्याचे मानले जात आहे. स्वतः सैनी हे ओबीसी समाजातून येतात आणि या समाजाची लोकसंख्या हरियाणात सुमारे तीन टक्के आहे. तसेच एकूण ओबीसींची संख्या 30 ते 32 टक्के आहे. मुख्यमंत्री या नात्याने सैनी नवखे असले, तरी खट्टर यांच्याकडून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. राज्यात लोकसभेसाठी भाजपला विजयी करण्याची मुख्य जबाबदारी खट्टर यांच्यावरच आहे. मुख्य म्हणजे यावेळी भाजप स्वबळावर या राज्यात लोकसभा लढणार आहे. दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टीने गेल्या चार वर्षांपासून भाजपशी केलेली युती तोडली आहे. तथापि, त्यामुळे भाजपचे काम आणखी सोपे झाले आहे. कारण, जाट मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ अंतिमतः भाजपला होण्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसची सूत्रे हुड्डांकडे

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. ते स्वतः जाट समाजातून येतात. हरियाणाची भूमी जाटलँड म्हणूनच ओळखली जाते. या प्रदेशात जाट समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, आता दुष्यंत चौताला यांनी स्वबळाचा नारा दिल्याने जाट समाजाच्या मतांचे विभाजन होणे अटळ आहे. चौताला यांची मदारही जाट मतांवर आहे. काँग्रेसने भाजपला टक्कर देण्यासाठी शेतकर्‍यांच्या कल्याणाच्या योजना आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या आहेत. त्यातील काही योजना हुड्डा यांनी सुचविल्या होत्या. याखेरीज महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरही काँग्रेसने प्रचारात गती दिली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दीपक बावरिया हे सध्या काँग्रेसचे हरियाणा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. उमेदवारांच्या नावांवर विचार सुरू असून आम्ही लवकरच अंतिम यादी जाहीर करणार आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे.

तिरंगी लढत अटळ

दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टीने राज्यातील सगळ्या जागा लढविण्याचे ठरविल्यामुळे येथे तिरंगी लढत होणे अटळ आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते चौताला मैदानात उतरल्यामुळे विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरक फार मोठा असणार नाही. काँग्रेसशी जागा वाटपासाठी चौताला उत्सुक असल्याचे सांगितले जात असले, तरी काँग्रेसने त्यात रस दाखविलेला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button