नवी दिल्ली- पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी १३ एप्रिलला महाराष्ट्रातील भंडारा दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने राहुल गांधी पहिल्यांदा भंडारा दौऱ्यावर असणार आहेत. (Lok Sabha Election 2024) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोलीत काँग्रेस उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पहिल्या टप्प्यातील काँग्रेसचे पाचही उमेदवार उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. हे पाचही मतदारसंघ विदर्भातील आहेत आणि महाविकास आघाडीद्वारे सर्व पाचही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात विविध पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार दौरे करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी १३ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.
पूर्व विदर्भातील टोकावर असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासाठी राहुल गांधींना विशेष निमंत्रण दिल्याचे समजते. या प्रचारसभेवेळी भंडारा गोंदियाचे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, गडचिरोलीचे उमेदवार नामदेव किरसान, रामटेकचे उमेदवार श्याम कुमार बर्वे येथील उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या विविध निमित्ताने भंडारा जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र राहुल गांधी प्रचार सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राहुल गांधींशी थेट संबंध आहेत. पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघात उमेदवारी देताना नाना पटोले यांचाच वरचष्मा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राहुल गांधी नाना पटोले यांच्या विशेष आग्रहास्तव भंडारा दौऱ्यावर येत असल्याचे समजते.