

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चारचाकी गाडी दिल्लीतून चोरी गेली होती. ही गाडी वाराणसी येथे सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटकही केली आहे.
दिल्लीतील गोविंदपुरी भागातून १९ मार्च रोजी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेली होती. यानंतर चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'याप्रकरणी बडकल येथील दोघांना अटक केली आहे. त्यांची नावे शाहिद आणि शिवांग त्रिपाठी अशी आहेत. हे दोघे संशयीत आरोपी कार चोरण्यासाठी दुस-या एका चारचाकीतून आले होते. त्यानंतर दिल्लीतील गोविंदपुरी भागातून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चारचाकी गाडी चोरली. या कारची बडकल येथे नंबर प्लेट बदलण्यात आली. त्यानंतर अलिगढ, लखीमपूर खेरी, बरेली, सीतापूर, लखनौमार्गे वाराणसी गाठले. ही कार नागालँडला पाठवण्याचा आरोपींचा डाव होता.'