Lok Sabha Election-2024 : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ‘मुस्लिम लीग’ची छाप : PM नरेंद्र मोदींचा हल्‍लाबोल | पुढारी

Lok Sabha Election-2024 : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर 'मुस्लिम लीग'ची छाप : PM नरेंद्र मोदींचा हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्‍ध केलेल्‍या जाहीरनाम्‍यावर मुस्‍लिम लीगची छाप आहे. जुनी काँग्रेस यामध्‍ये कोठेही दिसत नाही. यामध्‍ये डावे प्रबळ झाले आहेत. जे मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ला मानला जात होते त्‍या जागांवरही काँग्रेस उमेदवार उभे करण्‍याचे धाड करत नाही. काँग्रेस ज्‍या काँग्रेस ज्या व्यक्तीला तिकीट देत आहे तो दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडत आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील जाहीर सभेत काँग्रेसवर हल्‍लाबोल केला.

आज काँग्रेस पक्षाकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना देश उभारणीचा दृष्‍टीकोन आहे. आजच्‍या भारताच्‍या आशा आणि आकांक्षांपासून काँग्रेस पक्ष पूर्णपणे तुटलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी प्रचलित होती तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेस अजिबात दिसत नाही. अशी काँग्रेस भारताला २१व्या शतकात पुढे नेऊ शकत नाही, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी केला.

फ्‍लॉप झालेला दोन मुलांची भूमिका असलेला चित्रपट पुन्‍हा प्रदर्शित

यावेळी नरेंद्र मोदी म्‍हणाले की, समाजवादी पार्टीला तासाला उमेदवार बदलावे लागतात. या पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. उत्तर प्रदेशमध्‍ये फ्‍लॉप झालेल्‍या दोन मुलांची भूमिका असलेला चित्रपट पुन्‍हा प्रदर्शित झाला आहे, असा टोलाही त्‍यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना लगावला.

इंडिया आघाडी जिंकण्यासाठी नाही तर एनडीए आघाडीला 400 पेक्षा कमी जागांवर रोखण्यासाठी लढत आहे. भ्रष्टाचारी एकत्र येऊन मोदींना धमकावत आहेत. मोदी मागे हटणार नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध त्वरीत कारवाई सुरूच राहील, असा
पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

तिहेरी तलाक रद्द करून आम्ही संपूर्ण मुस्लिम कुटुंबाला वाचवले

भाजप सरकारने तिहेरी तलाकची वाईट प्रथा संपवली आहे. मुस्लिम भगिनींच्या हितासाठी काम केले. त्यांना प्रतिष्ठा बहाल केली आहे. याचा फायदा केवळ मुस्लिम महिलांनाच झाला नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा झाला. जावई रागावला तर तिहेरी तलाक देईल, अशी भीती महिलेचा भाऊ, वडील, आई यांना वाटत होती. तिहेरी तलाकचा कायदा रद्द करून आम्ही केवळ मुस्लिम महिलांनाच नाही तर संपूर्ण मुस्लिम कुटुंबाला वाचवले. त्यासाठी मुस्लिम कन्या पुढील शतके मोदींना आशीर्वाद देत राहतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Back to top button