राणे व सामंत यांचे शक्तिप्रदर्शन; सलोख्याचेही प्रयत्न

राणे व सामंत यांचे शक्तिप्रदर्शन; सलोख्याचेही प्रयत्न
Published on
Updated on

ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी केव्हाच जाहीर झाली आहे. संपूर्ण मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांनी 'खळा बैठका' घेण्याचे सत्र चालवले आहे. महायुतीचा उमेदवार मात्र कोण, हा प्रश्न शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरी अनुत्तरित होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपणास पक्षाने उमेदवारी दिली, तर लढणार आणि जाहीर करणार, असे सांगत सिंधुदुर्गात कुडाळ येथे शक्तिप्रदर्शन केले. त्याचवेळी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीही रत्नागिरीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ आपलाच असल्याचा दावा केला. राणे आणि सामंत एका बाजूने उमेदवारीअगोदर शक्तिप्रदर्शन करत असून, दुसर्‍या बाजूला मात्र सावधगिरीची भूमिका म्हणून एकमेकात सलोखा वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत.

उदय सामंत यांनी राणे यांची कुडाळमध्ये अचानक येऊन भेट घेतली. त्याचवेळी आमदार नितेश राणे यांनी राणे व सामंत कुटुंबीयांमध्ये राजकारणापलीकडचे सलोख्याचे संबंध आहेत, असे जाहीर केले. रत्नागिरीतल्या शक्तिप्रदर्शनात किरण सामंत यांनी नीलेश राणे यांना कुडाळमध्ये विधानसभा निवडणुकीत 50 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी करणार, असे सांगत हा सलोखा आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला.

भाजपकडून राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर भाजपचा दावा असल्याचे सांगितले आहे, तर हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा दावा उदय सामंत करत आहेत. महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षांकडून या जागेसाठी ठाम दावा कायम आहे. म्हणूनच दोन्हींकडून शक्तिप्रदर्शनही सुरू आहे. जसजसा या मतदार संघाची उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होतो आहे, तसतशी महायुतीतील पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. परंतु, भाजप आणि शिवसेना या दोघांनाही असे वाटते, की आपल्याला उमेदवारी मिळेल. त्यामुळे सध्यातरी दोन्ही पक्ष एकमेकांची नाराजी ओढवून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. राणे यांनी जी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी किरण सामंत यांचे नाव येताच हात जोडून 'अरे बापरे' म्हटले होते. त्यामुळे सामंत गोटात नाराजी पसरली होती. किरण सामंत यांनी तर चक्क आपण माघार घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. नंतर ती शिवसेनेच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर मागे घेण्यात आली. मात्र, उदय सामंत यांनी लगेचच राणे यांची कुडाळमध्ये भेट घेऊन भाजप, शिवसेनेत कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी प्रयत्न केले. या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सलोख्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत.

एका बाजूला सलोखा वाढविण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसर्‍या बाजूला शक्तिप्रदर्शन सुरूच आहे. राणे यांचा कुडाळमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. कार्यकर्त्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मेळाव्यानंतर महायुतीची समन्वय बैठकही झाली. या बैठकीला सामंत नसले तरी शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. त्यात त्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, असा आपला आग्रह आहे. मात्र, राणे यांना उमेदवारी मिळाली तर आपण त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे कित्येक वर्षे राजकारणात एकमेकांविरोधात असलेले राणे-केसरकर आता हातात हात घालून चालू लागले आहेत. केसरकर आता माझ्याबद्दल चांगलं बोलतात, म्हणजे माझे ग्रह बदलले असे म्हणावे लागेल, अशी टिपणी करताना तो केसरकरांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे सांगत राणे यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राणे यांचे शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातही कार्यकर्त्यांचे मेळावे झाले.

तिकडे रत्नागिरीत किरण सामंत यांनीही शक्तिप्रदर्शन केले. अगदी उत्स्फूर्त जमलेल्या कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना डोक्यावर उचलून घेतले. या शक्तिप्रदर्शन मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नीलेश राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करणार असल्याचे जाहीर केले. त्याचाच अर्थ सामंत यांना उमेदवारी मिळाली, तर निवडून येण्यासाठी राणे यांचे पाठबळ आवश्यक आहे हे माहीत असल्यामुळेच सामंत यांनी सलोख्याची पावले टाकण्यास सुुरुवात केली आहे. उमेदवारी राणे किंवा सामंत या दोघांपैकी कुणालाही मिळाली, तर त्यांना निवडून येण्यासाठी एकमेकांची गरज लागणारच आहे. राणे यांची सिंधुदुर्गात तर सामंत यांची रत्नागिरीत अधिकची ताकद आहे. त्यामुळेच हा सलोख्याचा मार्ग अवलंबला जात आहे. एकूणच ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत यांना रोखण्यासाठी राणे आणि सामंत एकमेकांचे हात पकडून पुढे जाण्याचे धोरण अवलंबत आहेत. आता प्रतीक्षा आहे ती उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? भाजपला की शिवसेनेला? राणे यांना की सामंत यांना?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news