सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना समज | पुढारी

सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना समज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध अंतरीम अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यावर काल दोन्ही गटांनी आपापली मते न्यायालयासमोर मांडली होती. त्यानंतर आज अजित पवार गटाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे तसेच शरद पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरु नये, अशा स्पष्ट सुचना देत न्यायालयाने दोन्ही गटांना समज दिली आहे. तसेच आता इथे भांडण्यापेक्षा जनतेसमोर जा आणि निवडणुकीत एकमेकांसमोर उभे व्हा, असे मौखिक निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे’ अशा आशयाचा विशिष्ट मजकुर त्यासोबत प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. हे निर्देश अजित पवार गटाने पाळले नाही, असे म्हणत शरद पवार गटाने त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता तर सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीमध्ये अजित पवार गटाला दिलेल्या निर्देशातील शेवटची ओळ काढून टाकावी, अशा आशयाची विनंती करणारा अर्ज अजित पवार गटाच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी दाखल केला होता.

या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना समज दिली आहे. अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल, ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना न्यायालयाच्या निर्देशानुसार जो मजकूर लिहायला सांगितला आहे तो पूर्ण मजकूर सर्व ठिकाणी स्पष्टपणे लिहावा लागेल, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या. त्यामुळे अजित पवार गटाला घड्याळ चिन्हासह “हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि अंतिम निकालापर्यंत हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.” असा मजकुर असलेल्या जाहिराती पुन्हा मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये द्याव्या लागणार आहेत. तर शरद पवार गटाचे काही पदाधिकारी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह वापरत आहेत असे अजित पवार गटाने न्यायालयाला सांगितले होते. त्यावर शरद पवार गटाच्या लोकांनी कुठेही घड्याळ चिन्ह वापरु नये, अशी समज सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला दिली आणि हे दोन्ही अर्ज निकाली काढले.

Back to top button