Lok Sabha Election 2024 : काँग्रेस सोडल्यानंतर काही तासांतच गौरव वल्लभ भाजपमध्ये दाखल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस सोडल्यानंतर काही तासांतच गौरव वल्लभ भाजपमध्ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज (दि.४ एप्रिल)  पक्षाचा राजीनामा दिल्‍यानंतर काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश केला. बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल शर्मा यांनीही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

टीकेचा आसूड ओढत गौरव वल्‍लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

“आज काँग्रेस पक्षाची दिशाहीन वाटचाल सुरु आहे. सनातन धर्म आणि  देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांबाबत चांगला बोलताही येत नाही, “अशी खंत व्‍यक्‍त करत मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी गुरुवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर X वर काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दोन पानांचे राजीनामा पत्र पोस्ट करत पक्षाच्‍या धोरणांवर टीका करत प्रश्‍नांची सरबत्तीही केली हाेती.

काँग्रेस पक्षाची सध्‍या दिशाहीन वाटचाल

आपल्‍या पत्रात गौरव वल्लभ यांनी म्‍हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. जेव्हा मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा माझा असा विश्वास होता की काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे, जिथे तरुण, बुद्धीजीवी लोक आणि त्यांच्या विचारांचा आदर केला जातो; परंतु गेल्या काही वर्षांत मला जाणवले की पक्षाचे सध्याचे स्वरूप अनुकूल नाही. मोठे नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते यांच्यातील दरी भरून काढणे फार कठीण आहे, जे राजकीयदृष्ट्या आवश्यक आहे. जोपर्यंत कार्यकर्ता आपल्या नेत्याला थेट सूचना देऊ शकत नाही तोपर्यंत सकारात्मक बदल शक्य नाही. काँग्रेस पक्षाची सध्‍या दिशाहीन वाटचाल सुरु आहे. त्‍यामुळे मी पक्ष सोडत आहे. आज मी सनात धर्म आणि देशाच्या संपत्तीचा गैरवापर करणार्‍यांविरोधात बोलू शकत नाही. त्‍यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.”

संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे

‘अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या अभिषेक प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्षाच्या या भूमिकेने मला नेहमीच अस्वस्थकेले. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेकजण सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्षाने मौन बाळगणे म्हणजे त्याला जाचक अनुमोदन देण्यासारखे आहे. एकीकडे आपण जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे समाजाला दिशाभूल करणारा संदेश मिळतो. हा पक्ष एका विशिष्ट धर्माचा समर्थक आहे, हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असेही त्‍यांनी पत्रात स्‍पष्‍ट केले आहे.
आपल्या देशात व्यवसाय करून पैसे कमविणे चुकीचे आहे का?”

आर्थिक बाबींवर काँग्रेसची भूमिका देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा नेहमीच अपमान आणि गैरवापर करण्याची राहिली आहे. आज उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण (LPG) धोरणांच्या विरोधात गेलो आहोत. ज्यांच्या अंमलबजावणीचे संपूर्ण श्रेय जगाने आम्हाला दिले आहे. आपल्या देशात व्यवसाय करून पैसे कमविणे चुकीचे आहे का?”, असा सवालही त्‍यांनी केला आहे.
माझा आर्थिक क्षमता देशाच्या हितासाठी वापरावे. यासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाचे आर्थिक धोरण राष्ट्रीय स्तरावर मांडू शकलो असतो. मात्र पक्षाचा जाहीरनामा असो की धोरण यामध्‍ये याचा उपयोग झाला नाही. माझ्यासारख्या आर्थिक विषयांची जाण असलेल्या व्यक्तीसाठी श्वास कोंडण्यापेक्षा कमी नाही,” असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

कोण आहेत गौरव वल्लभ?

गौरव वल्लभ जोधपूर जिल्ह्यातील पिपर गावचा रहिवासी आहेत. पीएचडी पूर्ण केल्‍यानंतर ते जमशेदपूरच्या XLRI कॉलेजमध्ये प्राध्यापक पदी नियुक्‍त झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यानंतर 2023 मध्ये उदयपूर मतदारसंघातून राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली होती.

 

Back to top button