IIT Bombay Placement : आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये ३६ टक्के विद्यार्थ्यांना ऑफर्सच नाही

IIT Bombay Placement : आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये ३६ टक्के विद्यार्थ्यांना ऑफर्सच नाही

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आयआयटी मुंबईतील ८५ विद्यार्थ्यांना जानेवारीमध्ये झालेल्या प्लेसमेंटमध्ये १ कोटी रूपयांची जॉब ऑफर्स मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही कंपनीकडून नोकरीच्या ऑफर्स मिळालेले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आयआयटी मुंबईतील नोंदणीकृत दोन हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७१२ विद्यार्थ्यांना यंदा कोणतीही प्लेसमेंट मिळालेली नाही. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपवर हा डेटा शेअर करण्यात आल्यानंतर हे चित्र समोर आले आहे.

आयआयटी पवई कॅम्पसमध्ये प्लेसमेंट सुरू असून यात देशविदेशातील अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सध्या आयआयटीमध्ये सुरू असलेली प्लेसमेंट प्रक्रिया मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. कॉप्युटर सायन्स आणि इंजिनीयरींगच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षी प्लेसमेंटमध्ये संधी मिळते. मात्र यावर्षी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईचे ३२.८ टक्के विद्यार्थी नोकरी मिळवण्यात अपयशी ठरले होते. यंदा ही संख्या २.८ टक्क्यांनी वाढल्याने आयआयटी सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही हे गंभीर असल्याचे दिसून आले आहे. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या घटलेल्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. २०२३ च्या तुलनेत बेरोजगारीमध्ये तीन टक्यांनी झालेली वाढ ही भयावह आहे असेही म्हटले जात आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयआयटी-मुंबईतील विद्यार्थ्यांची ही निराशाजनक स्थिती आहे. या विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यात कशी मदत करणार आहे याची माहिती दिली पाहिजे असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.

अमेरिका आणि ब्रिटन मधील काही कंपन्या देशाबाहेर गुंतवणूकीस तयार नसल्याने आतापर्यंत त्यांनी आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला नसल्याचेही दिसून आले आहे. जागतिक आर्थिक मंदीचा फटका यंदाच्या प्लेसमेंटला मिळाला असल्याचे आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासदार राहुल गांधी यांची टीका

आपल्या देशात आयआयटीसारख्या सर्वोच्च संस्थाही 'बेरोजगारीच्या आजाराच्या' विळख्यात आल्या आहेत. आयआयटी मुंबईमध्ये गेल्या वर्षी ३२ टक्के आणि यंदा ३६ टक्के विद्यार्थ्यांना ऑफर मिळाल्या नाहीत. देशातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या आयआयटीची अवस्था आहे,भाजपने संपूर्ण देशाची स्थिती अशी तयार केली आहे अशी टिका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी एक्स वर केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news