Vijender Singh : मुष्टीयोद्धा विजेंदर सिंहची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Vijender Singh : मुष्टीयोद्धा विजेंदर सिंहची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुष्टीयोद्धा (बॉक्सर) विजेंदर सिंहने ( Vijender Singh ) लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. विजेंदर सिंह यापुर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी दक्षिण दिल्लीतून २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, भाजपचे रमेश बिधुरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, साक्षी मलिक आणि इतर काही महिला खेळाडूंसोबत झालेल्या गैरप्रकाराबाबत विजेंदर सिंह यांनी भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या 

मुष्टीयोद्धा (बॉक्सर) विजेंदर सिंहने आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप नेते रामवीर सिंह बिधुरी आणि राजीव बब्बर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर “मी देशहितासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला अधिकाधिक लोकांना मदत करायची आहे.” असे विजेंदर सिंह म्हणाले.

सुत्रांच्या माहितीनुसार, विजेंदर सिंह यांना काँग्रेसच्या वतीने आगामी निवडणुकीत मथुरा लोकसभेतून खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात लढवण्याचा विचार केला जात होता. मात्र, त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विजेंदर सिंह काँग्रेसमध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांनी “माझ्या बॉक्सिंग करिअरमधील वीस वर्षांहून जास्त काळ देशाला अभिमान वाटेल, असे काम केले आहे. आता माझ्या देशासाठी काहीतरी करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने मी ही संधी घेऊ इच्छितो आणि यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी झाले होते.

देशातील पहिले बॉक्सर

विजेंदर सिंहने ( Vijender Singh ) यांनी २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिक गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमधील पदक जिंकणारे देशाचा पहिले बॉक्सर बनत भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले होते. विजेंदर सिंहने पुढे २००९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावत आपला दबदबा कायम राखला होता. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत विजेंदर सिंह यांना २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२ मध्ये विजेंदर सिंह यांच्या क्रीडा प्रवासाला नाट्यमय वळण मिळाले. त्याच्यावर डोपिंगमध्ये सहभागी असल्याचे आरोप झाले. मात्र, नंतर यातून त्यांची निर्दोष मुक्तताही करण्यात आली होती.

 

Back to top button