नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे दिला आहे. जळगाव लोकसभा क्षेत्राचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने आगामी लोकसभेसाठी उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील जळगाव लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले होते. खासदारकीची निवडणूक जवळपास साडेचार लाखांच्या मताधिक्याने उमेश पाटील यांनी जिंकली होती. असे असतानाही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी नाकारल्यानंतर काही दिवस उन्मेष पाटील यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे उन्मेश पाटील नाराज नाहीत आणि ते भाजपमध्येच राहणार आहेत, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, आज त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला. तसेच राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नाही, अशी टीका केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' असे लिहिले होते. उन्मेष पाटील यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' लिहिले होते. राजीनामा दिल्याबरोबर त्यांनी 'मोदी का परिवार' हे शब्द त्यांच्या नावसमोरून काढून टाकले.