पुढारी ऑनलाईन डेस्क : तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २१ मार्च रोजी अटक झाल्यापासून साडेचार किलो वजन घटले आहे. केजरीवाल यांच्या घटत्या वजनावर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केल्याचा दावा आपने केला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ७ एप्रिल रोजी देशभरातील आप नेते दिल्लीतील जंतरमंतर येथे सामूहिक उपोषण करणार आहेत.
"अरविंद केजरीवाल यांना मधुमेह आहे. आरोग्याची समस्या असूनही ते २४ तास देशाच्या सेवेत कार्यरत होते. अटक झाल्यापासून आतापर्यंत त्यांचे वजन ४.५ किलोने कमी झाले आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजप त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे," असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी केला आहे. मात्र, तिहार तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार केजरीवाल पूर्णपणे बरे आहेत. तुरुंगातील डॉक्टरांनी अशी कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी भाजप आणि केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी आज (दि.३) माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ७ एप्रिल रोजी देशभरात सामूहिक उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोपाल राय म्हणाले, 'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ 'आप'चे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाचे नेते ७ एप्रिल रोजी जंतरमंतरवर 'सामूहिक उपोषण' करणार आहेत. जे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आहेत आणि लोकशाही वाचवू इच्छितात आणि या देशावर प्रेम करू इच्छितात त्यांनी त्यांच्या घरी, गावात किंवा तालुक्यात 'सामूहिक उपोषण' करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातील पहिली रात्र अस्वस्थतेत गेली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ते झोपले नव्हते. मंगळवारी सकाळी ते खूपच आरामात दिसत होते. त्यांनी योगा केला, नंतर तुरुंगाच्या नियमानुसार त्यांना साखरेशिवाय चहा आणि ब्रेड देण्यात आला. यानंतर त्यांनी वर्तमानपत्र वाचले आणि काही काळ टीव्ही देखील पाहिली.
हेही वाचा :